शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शन कालावधीत विद्यार्थी व युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
schedule29 Oct 25 person by visibility 71 categoryराज्य
▪️जिल्हाधिकारी यांच्याकडून पुढील नियोजनाबाबत आढावा
▪️आत्तापर्यंत पाच हजार नागरिकांकडून प्रदर्शनाला भेट
कोल्हापूर : येथे आयोजित “शिवशस्त्र शौर्यगाथा” या अद्वितीय ऐतिहासिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला असून, दोन दिवसात पाच हजाराहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या प्रदर्शनासाठी करण्यात आलेल्या सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला आणि आवश्यक सुधारणा व सोयींबाबत बैठकीतून सूचनाही दिल्या.
या प्रदर्शनाचे आयोजन पुढील आठ महिन्यांसाठी करण्यात आले आहे. या कालावधीत शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व, निबंधलेखन आणि अनुभव लेखन स्पर्धांचा समावेश असेल. या माध्यमातून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य आणि ऐतिहासिक वारसा यांची ओळख करून देणे हा उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर “माझा अनुभव” या स्वरूपात लेखन सादर करायचे आहे. तसेच, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलेल्या बाराही किल्ल्यांच्या अनुषंगाने निबंधही लिहायचे आहेत. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याशिवाय, शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल जाणिवा निर्माण करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाद्वारे करण्यात येतील.
या विषयावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, पुरातत्त्व विभागाचे समन्वयक उत्तम कांबळे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छता राखणे, तसेच वृद्ध आणि लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करणे याबाबत संबंधित विभागांना निर्देश दिले. त्यांनी पुरातत्त्व खात्याला शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शन स्थळाकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना केल्या.
प्रदर्शन रोज सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खुले राहील. मात्र, दर सोमवारी प्रदर्शन बंद राहणार आहे. सुरक्षा आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण लक्षात घेऊन नागरिकांना प्रदर्शन स्थळी कक्षात मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.
शिक्षण विभागाला जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना समाविष्ट करून दररोज नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रदर्शन दाखविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एकाच दिवशी गर्दी टाळण्यासाठी शाळांना स्वतंत्र तारखा देण्यात येतील.
ही प्रदर्शनी केवळ इतिहासाचे पुनरुज्जीवन नाही, तर तो अभिमानाने पुढील पिढीकडे पोहोचविण्याचा एक लोकोत्सव आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि युवकांचा सहभाग आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी म्हटले.
बुधवारी दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाला 2523 पुरुष, 1129 महिला तर आतापर्यंत एकूण 3843 पुरुष व 2070 महिलांनी भेट दिली.