...अचानक मध्यरात्री आमदार क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी; अनुपस्थित अधिकारी आणि ठेकेदारास सुनावले खडे बोल
schedule13 Oct 25 person by visibility 86 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापुरातील रस्त्यांवरून गेले काही दिवस नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. निधी मंजूर करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे पण.. रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे काम महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे.. असे असताना पालकमंत्री, आमदार, खासदार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आक्रमक भूमिके घेत असल्याचे पहायला मिळत असतानाही महापालिका अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य आहे कि नाही असा सवाल नागरीकांमधून व्यक्त केला जात आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेत आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा योग्य असण्यासाठी रस्त्यांचे काम सुरु असताना जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित असणे अनिवार्य आहे, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात प्रमुख रस्त्यांच्या कामास सुरवात करण्यात आली आहे.
काल मध्यरात्री अचानक आमदार राजेश क्षीरसागर यांनी दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर लक्ष्मीपुरी या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामास भेट दिली. पण दिलेल्या सुचनेनुसार अधिकारी आणि प्रमुख ठेकेदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निदर्शनास आल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ संबधित अधिकारी आणि ठेकेदाराशी संपर्क साधून खडे बोल सुनावले. शहरातील रस्त्यांचा दर्जा टिकविण्याची जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदाराची असल्याचे सांगत त्यांनी यापुढे रस्त्यांच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घ्यावे, अशा सक्त सूचना यावेळी दिल्या.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या अचानक भेटीची चर्चा शहरात सुरु असून आमदार क्षीरसागर यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.