राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला गटस्तर विजेतेपद; आठ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट प्रेझेंटर’ पुरस्कार
schedule13 Oct 25 person by visibility 53 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयातर्फे आयोजित १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या राष्ट्रीय स्तरावर शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत गटस्तर विजेतेपद पटकावले आहे.
राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे दर्शन घडवित असतानाच विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठीचे “बेस्ट प्रेझेंटर” पुरस्कार पटकावले. यामध्ये स्वप्निल माने, संदेश लडकट, नेहा शिंदे, तेजस सन्मुख, श्रेया म्हापसेकर, चंदनकुमार ओझा, श्रुती कुरणे, प्रतिभा बामणे या आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
युवा संसद स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, संसदीय प्रक्रिया आणि संवाद कौशल्यांचा विकास साधला जातो. राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तेची आणि सुसंस्कृत नेतृत्वाच्या जडणघडणीसाठी विद्यापीठ घेत असलेल्या परिश्रमांची पुनर्प्रचिती आली आहे.
युवा संसदेमध्ये शपथ ग्रहण करणे, श्रद्धांजली अर्पण, नूतन मंत्र्यांचा परिचय, प्रश्नोत्तराचा तास, विशेषाधिकार भंग प्रस्ताव, आवश्यक अहवाल किंवा दस्तऐवजाची सभेसमोर मांडणी, राज्यसभेकडून संदेश संसदेमध्ये सादरीकरण, विदेशी प्रतिनिधींचे संसदेमध्ये औपचारिक स्वागत, लक्ष्यवेधी प्रस्ताव, बिल पास करणे, नवीन कायदे, विधेयक प्रस्तावांचा विचार करणे, सभागृह विसर्जित करणे आदी मुद्द्यांवर प्रत्यक्ष संसदेप्रमाणे कामकाज चालवले गेले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कोलकता (पश्चिम बंगाल) येथील राज्यसभेचे माजी खासदार ब्रतीन सेनगुप्ता, केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाच्या युवा संसद उपक्रमाचे संचालक ए.बी. आचार्य आणि पुणे येथील राज्यशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. वैशाली पवार उपस्थित होते. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी युवा संसद स्पर्धा उपक्रमाचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले आणि स्पर्धा संयोजन समितीने परिश्रम घेतले.