वाचन ही सवय नव्हे; तर संस्कृती : प्रा. मनोज बोरगावकर; दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यान
schedule13 Oct 25 person by visibility 66 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : उत्तम पुस्तक वाचनाबरोबर माणूस आणि निसर्ग वाचता आला पाहिजे. पुस्तक वाचून माणूस समृद्ध होतो. म्हणून वाचन ही सवय नसून संस्कृती असल्याचे प्रतिपादन नांदेड येथील लेखक, कादंबरीकार आणि कवी प्रा. मनोज बोरगावकर यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने “वाचन प्रेरणा दिन” निमित्त ‘वाचन संस्कृती आणि “नदीष्ट”ची निर्मितीप्रक्रिया’ या विषयावर डॉ. बोरगावकर यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. कुलसचिव डॉ. विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ.रणधीर शिंदे, सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. एकनाथ अंबोकर, डॉ. रमेश साळुंखे, युवराज कदम आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींसह साहित्यरसिक व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. बोरगावकर म्हणाले, वाचनातूनच संवेदनशीलता निर्माण होते आणि समाज बदलण्याची शक्ती जन्माला येते. आपली इमान आणि निष्ठा शाबूत ठेवायला वाचन कारणीभूत असते. ‘नदीष्ट’ कादंबरीतील विविध प्रसंगांचे संदर्भ देत तिची सर्जनशील निर्मिती प्रक्रिया, निसर्गाशी तीच असलेलं नातं आणि त्यावरील वाचकांच्या प्रतिक्रियांचा अनुभव कथन केला. ‘नदीष्ट’ कादंबरी ही केवळ कथा नसून, मानवी निसर्ग, वेदना, नाती आणि समाज यांचा सखोल शोध आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, वाचन हीच खरी विचारशक्तीची जननी आहे. लेखक आणि निसर्ग यांचे नाते जितके जिव्हाळ्याचे, तितक्याच तीव्रतेने त्यांच्या लेखनातून जीवन उलगडते. प्रा. बोरगावकर यांनी साहित्य, पर्यावरण आणि शैक्षणिक जबाबदारी यांचा सुंदर मेळ घालून युवा पिढीसाठी मार्गदर्शक विचार मांडले.
यावेळी दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रवीण लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चांगदेव बंडगर यांनी आभार मानले.