कोल्हापुरात खड्ड्यांचा वाढदिवस! शाहू सेनेकडून ‘हॅपी बर्थडे खड्डे’ आंदोलनात महापालिकेचा निषेध
schedule13 Oct 25 person by visibility 72 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात शाहू सेनेकडून आगळावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ‘हॅपी बर्थडे खड्डे’ या नावाने शहरात आंदोलन राबवत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी खड्ड्यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्रासाचे प्रमाण वाढले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने कोल्हापूरच्या विकासाला अक्षरशः खिळ बसल्याची टीका शाहू सेनेकडून करण्यात आली.
मागील तीन वर्षांत शाहू सेनेकडून खड्ड्यांवर विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली होती. शहरातील १०० जीवघेण्या खड्ड्यांचे छायाचित्र प्रदर्शन, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण, आणि निदर्शने यानंतरही प्रशासन जागे झाले नाही. त्यामुळे यंदा खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून निषेध नोंदवण्यात आला.
या वेळी खड्ड्यांना फुलांची सजावट, वाढदिवसाचे फलक, रांगोळ्या आणि केक कापून ‘वाढदिवस साजरा’ करण्यात आला. “कोल्हापूरची नवी ओळख खड्डेपुर!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी म्हणाले, “प्रशासक राज असलेल्या महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. कोट्यवधींच्या निधीचा चुराडा होतो, अधिकारी स्वतःची पाठ थोपटतात, पण कोल्हापूरकरांच्या पाठीचे हाल कोणालाच दिसत नाहीत. वाहनांचे नुकसान, धुळीचे आजार, आणि शहराची बदनामी यासाठी प्रशासनच जबाबदार आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की,
“राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर शहराची अशी दुर्दशा लज्जास्पद आहे. सात दिवसांत खड्ड्यांबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास शाहू सेना तीव्र आंदोलन उभारेल.”
या आंदोलनात शुभम शिरहट्टी, चंदा बेलेकर (उपाध्यक्ष), चंद्रकांत कांडेकरी, फिरोज शेख, राहूल चौधरी, दाऊद शेख, ऋतुराज पाटील, करण कवठेकर, किरण कांबळे, साहिल पडवळे, अथर्व पाटील, अभिषेक परकाळे, प्रधान विखळकर, अजित पाटील, शशिकांत सोनुर्ले, अजय शिंगे, देवेंद्र माळी, अजित साळुंखे, वैजनाथ नाईक, शुभम किरूळकर, पृथ्वीराज शिंदे, आदित्य कांबळे, रोहन ताटे, विराज शिंदे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.