नागरिकांनी आरोग्य शिबिरातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
schedule13 Oct 25 person by visibility 61 categoryराज्य

▪️राधानगरीत पाच दिवसीय मोफत सर्वरोग निदान शिबिराचे भव्य उद्घाटन
कोल्हापूर : राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात आज ‘पाच दिवसीय मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरा’चे भव्य उद्घाटन महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झाले. ‘आरोग्य आपल्या दारी’ या शासनाच्या संकल्पनेनुसार आयोजित या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान मंत्री आबिटकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड, मोफत चष्मे आणि श्रवण यंत्रांचे वाटप केले. यावेळी त्यांनी नागरिकांना संबोधित करताना नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले आणि सर्वांनी शिबिरातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. ‘आरोग्यपूर्ण दिवाळी’ संकल्पनेच्या अंतर्गत तपासणीतील रुग्णांना पुढील उपचार मोफत दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.
हे शिबीर १३ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत चालणार असून, यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. HLL (हिंदुस्थान लाईफकेअर लिमिटेड) मार्फत मोफत रक्त चाचण्या, ई.सी.जी., एक्स-रे, सोनोग्राफी, २डी ईको यांसारख्या तपासण्या केल्या जातील. अत्याधुनिक कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी, तसेच क्षयरोग, कुष्ठरोग आणि स्त्रीरोग तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून होईल. ० ते १५ वर्ष वयोगटातील मुलांसाठी विशेष तपासणी आणि उपचार, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि आयुष्यमान कार्ड वाटप केले जाईल. याशिवाय, अवयवदान जनजागृती मोहीम आणि क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी ‘निश्चय मित्र आहार किट’चे वाटपही होईल.
*शिबिराचे नियोजन* : १३ ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक आणि ० ते १५ वयोगटातील मुलांची तपासणी, १४ आणि १५ ऑक्टोबरला १५ ते ६० वयोगटातील महिलांची तपासणी, तर १६ आणि १७ ऑक्टोबरला १५ ते ६० वयोगटातील पुरुषांची तपासणी होईल.
उद्घाटन सोहळ्याला डॉ. दिलीप माने (उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ), डॉ. प्रशांत वाडीकर (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. अनिरुद्ध पिंपळे (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. हर्षदा वेदक (जिल्हा क्षयरोग अधिकारी), डॉ. हेमलता पालेकर (सहायक संचालक, कुष्ठरोग), तसेच स्थानिक मान्यवर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी या शिबिराचा लाभ घेऊन निरोगी जीवनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले.