‘गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत
schedule10 Aug 25 person by visibility 150 categoryगुन्हे

▪️सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️“सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!”
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन
▪️‘गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकरण
नागपूर : काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी 'गरुड दृष्टी' हे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे ‘गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल 10 कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या.
यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशी, राजेंद्र दाभाडे, शिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणे, धमक्या देणे, हेट स्पीच, फेक न्यूज, अंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात. त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी 'गरुड दृष्टी' प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणे व त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल. भविष्यात या टूल्सचा विस्तार आणि क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज ज्या लोकांना त्यांचे पैसे मिळाले त्या व्यक्तींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी प्रस्ताविक केले. उपायुक्त लोहित मतानी यांनी कार्यक्रमापूर्वी गरुड दृष्टि बाबत सादरीकरण केले. सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
▪️फसवणूक झालेल्या लोकांना तपासानंतर परत मिळाल्या अशा रकमा
रोहित अग्रवाल 73 लाख रुपये, शशिकांत नारायण परांडे 34 लाख 77 हजार 724, देविदास पारखी 35 लाख 15 हजार 842, विजय प्रकाश पाठक 19 लाख 90 हजार 354, विजय मेनघाणी 19 लाख रुपये, देवेंद्र खराटे 12 लाख 81 हजार, श्रीमती राजमनी अजय जोशी 29 लाख 95 हजार, राहुल चावडा 15 लाख, बुद्धपाल बागडे 10 लाख, आदित्य गोयंका 26 लाख 20 हजार 556, संगीता आष्टणकर 8 लाख 24 हजार रुपये या प्रमाणे रक्कम परत करण्यात आली. ही प्रातिनिधिक नावे आहेत.
🌐 गरुड दृष्टी चे वैशिष्ट्ये व यश
▪ सोशल मीडिया मॉनिटरिंग: गरुड दृष्टि सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोशल मीडियावरील 30,000 पोस्ट्स तपासण्यात आल्या आहेत.
▪ आक्षेपार्ह सामग्रीवर कारवाई: यापैकी 650 आक्षेपार्ह पोस्ट्सची नोंद घेऊन त्या संबंधित प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आल्या आहेत.
▪ कायदा व सुव्यवस्था नियंत्रण: सोशल मीडियामधून उद्भवणाऱ्या अफवा, द्वेषपूर्ण मजकूर, वादग्रस्त पोस्ट्स यामुळे होणारे तणाव व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी या साधनाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
▪ कमी खर्चातील स्थानिक नवकल्पना: सायबर हॅक 2025 स्पर्धेतून उदयास आलेले हे साधन अत्यल्प खर्चात विकसित करण्यात आले असून, याचे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) नागपूर पोलिसांकडे आहेत.
▪ बहुपयोगी क्षमता: गरुड दृष्टि केवळ गुन्हे प्रतिबंधासाठीच नव्हे, तर समाज माध्यमांवरील ट्रेंड्सचे विश्लेषण, संशयास्पद खाते शोधणे, व तत्काळ कारवाई करण्यासाठी उपयुक्त आहे.