स्मॅक आयटीआयचे गुणवंत विद्यार्थी ठरले महापारेषणसाठी योग्य !
schedule10 Aug 25 person by visibility 144 category

कोल्हापूर : औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या स्मॅक आयटीआयने यंदा आणखी एका अभिमानाची भर घातली आहे. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी [महापारेषण] मध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन,कोल्हापूर (स्मॅक) संचलित श्रीमती सोनाबाई शंकरराव जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र आणि स्व. जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी - महापारेषण मध्ये विद्युत साहाय्यक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल गुुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले .
या समारंभास स्मॅक चे चेअरमन राजू पाटील व आयटीआय कमिटी चेअरमन प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ट्रेनिंग कमिटी सदस्य एम. वाय. पाटील, भीमराव खाडे, कोयना वीज निर्मिती संचलन विभागाचे उपकार्यकारी अभियंता अभिजीत वाघमोडे हे ही उपस्थित होते.
विद्युत साहाय्यकपदी नियुक्त झालेले संकेत कणिरे, सुजित भोसले, स्वालिया जमादार, मंजुषा घोडके आणि सानिया जमादार या विद्यार्थ्यांचा तसेच मर्चंट नेव्ही मध्ये निवड झालेल्या कार्तिक मोकाशी याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमात ड्राफ्ट्समन मेकॅनिकल कोर्समधील रिया गुरव हिच्या प्रशिक्षणासाठी उद्योजक राजुल लायन्सवाला यांनी ५०% फीचा प्रायोजकत्व वाटा उचलला. या उपक्रमातून ‘एक उद्योजक - एक प्रशिक्षणार्थी’ ही संकल्पना मूर्त रूपात राबवली जात असल्याचे अधोरेखित झाले. राजुल लाईन्सवाला यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेला पुढाकार व मार्गदर्शन इतर उद्योजकांसाठी प्रेरणादायक ठरले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत प्राचार्य प्रसन्न वरखेडकर म्हणाले, आजच्या औद्योगिक युगात कौशल्यसंपन्न मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. मात्र दुसरीकडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अपुरी असल्याचे चित्र आहे. या विसंगतीतून मार्ग काढण्यासाठी स्मॅक आयटीआय ही संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. ते पुढे म्हणाले, संस्थेमध्ये आज अत्याधुनिक यंत्रसामग्री,अनुभवी प्रशिक्षक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सुसज्ज वातावरण स्मॅकने उपलब्ध करुन दिले आहे. यामुळेच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना १००% नोकरीची हमी देऊ शकतो.स्मॅक चे चेअरमन राजू पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केवळ शिक्षण असून चालत नाही, तर योग्य दिशा आणि व्यावसायिक कौशल्य आवश्यक आहे. आयटीआयमधून प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. स्मॅक आयटीआय ही केवळ संस्था नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी करणारी प्रयोगशाळा आहे व पुणे प्रादेशिक विभागात बेस्ट आयटीआय पुरस्कार प्राप्त
नामांकन मिळवणारी संस्था ठरली आहे.
आयटीआय कमिटी चेअरमन प्रशांत शेळके म्हणाले, ही संस्था उद्योजकांनी तयार केलेली असल्याने प्रशिक्षणाची गुणवत्ता अत्युच्च असून, विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील वास्तवाशी जुळवून घेण्यास मदत होते. पीएलसी मशीनद्वारा प्रशिक्षण, कमिन्सद्वारे उपलब्ध यूएसए निर्मित अँमेट्राँल किट,तसेच इंडस्ट्रीयल प्रात्यक्षिक अनुभव व उद्योजकांचे मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते विद्युत साहाय्यक परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवडीत चमकतात. संंस्थेेत दरवर्षी प्रवेशासाठी यासाठी चुरस होत असते.कार्यक्रमाचे सुरळीत आयोजन व संयोजन स्वरूप धने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. स्नेहल धने यांनी केले.हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव नव्हता, तर भविष्यातील अनेकांना प्रेरणा देणारा आदर्श ठरला.