विद्यार्थ्यांना रोजगार संधींच्या दृष्टीने ‘एईडीपी’ उपयुक्त: डॉ. एन.एन. वडोदे; शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय विशेष कार्यशाळा
schedule11 Jul 25 person by visibility 224 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : देशात रोजगारवृद्धी होण्याच्या अनुषंगाने ‘अप्रेंटिसशीप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम’ (एईडीपी) अंमलात आणण्यात येत असून विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्येच नोकरीची हमी मिळण्याच्या दृष्टीने हा उपक्रम लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशीप ट्रेनिंगचे (बीओएटी) पश्चिम विभागीय उपसंचालक डॉ. एन.एन. वडोदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात आज एईडीपीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यापीठातील शिक्षकांसह संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांसाठी एकदिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. वडोदे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी स्तरापासूनच विद्यार्थ्यांना रोजगार प्रशिक्षण देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. तीन वर्षांच्या पदवीसाठी एक सत्र आणि चार वर्षांच्या पदवीसाठी दोन सत्रे विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यवसाय-उद्योगामध्ये अप्रेंटिसशीप करणे अनिवार्य आहे. अधिकतर स्थानिक पातळीवरच विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळावे, यासाठी महाविद्यालयांसह विद्यापीठाने प्रयत्न करावा. कोल्हापूरच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास या परिसरात चार हजारांहून अधिक उद्योग आहेत. येथील व्यावसायिक, उद्योजकही विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशीप देण्याबाबत सकारात्मक आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थी काम करतही आहेत. अन्य विद्यार्थ्यांना अशी प्रशिक्षण संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना द्यावयाची संधी आणि भत्ता या अनुषंगाने बीओएटी प्रभावी मध्यस्थाची भूमिका बजावेल.
बीओएटीसमवेत आजवर अनेक डिम्ड व स्वायत्त विद्यापीठांनी सामंजस्य करार केले आहेत. तथापि, शिवाजी विद्यापीठ हे अशा प्रकारचा सामंजस्य करार करणारे पहिले राज्य अकृषी विद्यापीठ ठरले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शिक्षकांनी सुद्धा एईडीपी ही संकल्पना उत्तम प्रकारे समजून घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना तिचे लाभ घेण्यासाठी प्रेरित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अनेक अभ्यासक्रमांना वरिष्ठ नियामक प्राधिकरणांचे नियम लागू असतात. त्यांच्या मान्यतेखेरीज एईडीपीसंदर्भात पुढे जाणे अशक्य असले तरी बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पारंपरिक अभ्यासक्रमांच्या विनाअनुदानित तुकड्यांपासून अंमलबजावणीला सुरवात करता येणे शक्य आहे. त्या अनुषंगाने येत्या ३१ जुलैपर्यंत अभ्यासक्रमांची संरचना करावी लागेल. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी एईडीपी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सविस्तर सादरीकरण केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी आभार मानले. यावेळी वित्रान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. ज्योती जाधव यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.