संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची उभारणी गुणवत्तापूर्ण होईल : मंत्री उदय सामंत
schedule08 Aug 25 person by visibility 103 categoryराज्य

▪️नाट्यगृहाच्या कामाची पाहणी, सोलर संयंत्र आणि मराठी चित्रपट प्रदर्शन सुविधेच्या उभारणीच्या सूचना
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस थोडा विलंब झाला असला, तरी सर्व कामे महापालिकेकडून गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून पूर्वीप्रमाणेच या नाट्यगृहाची भव्य उभारणी होईल, असा विश्वास उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहरातील नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींसमवेत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची त्यांनी पाहणी केली.
शासनाने नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी दिलेल्या 25 कोटी रुपयांमधील कामांची पाहणी करीत महापालिकेला आवश्यक सूचनाही त्यांनी केल्या. ते म्हणाले, हेरिटेज समिती तसेच नाट्य क्षेत्रातील अनुभवी तसेच नाट्य मंडळाच्या सूचनांचा समावेश नाट्यगृहाच्या उभारणीत करावा. यावेळी नाट्य क्षेत्रातील मिलिंद अष्टेकर, आनंद कुलकर्णी, सुनील घोरपडे, नाट्य परिषदेचे संचालक इतर रंगकर्मींसमवेत कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त रवीकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, सहायक अभियंता सुरेश पाटील, मिलिंद पाटील, नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत यांनी व्यावसायिक रंगभूमीच्या निर्मात्यांना नाट्यगृह स्वस्त दरात उपलब्ध व्हावे आणि वीज खर्च कमी व्हावा यासाठी सोलर संयंत्र बसवणे आवश्यक आहे, असे नमूद केले. यामुळे व्यावसायिक रंगभूमीच्या निर्मात्यांना निर्मिती आणि सादरीकरणाच्या खर्चात समतोल राखता येईल, तसेच मराठी नाट्य निर्मितीला चालना मिळेल. सोलर संयंत्रामुळे नाट्यगृहाचे भाडेदर कमी करून ते सामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देता येईल, असेही ते म्हणाले.
केशवराव भोसले नाट्यगृह ही हेरिटेज इमारत असल्याने त्यावर सोलर पॅनल्स बसवण्याऐवजी बाजूला पुरेशी जागा शोधून त्यावर सोलर संयंत्र उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कलादालनात सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाची क्षमता वाढवून ती वीज नाट्यगृहातही वापरावी, असे त्यांनी सुचवले. तसेच, नाट्यगृहातील ग्रीन रूम अत्याधुनिक पद्धतीने तयार करावी आणि आसन क्षमता पूर्वीप्रमाणेच पुरेशी ठेवून ती उच्च दर्जाची असावी, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. बांधकामाव्यतिरिक्त आतमध्ये होणाऱ्या सुविधांमध्ये पडदे, प्रकाशयोजना, बसण्याची व्यवस्था यांसारखी अनुषंगिक कामे किमान 30 ते 35 वर्षे टिकतील अशा गुणवत्तेची करावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. याशिवाय, खासबाग मैदानाकडील रंगमंचही उच्च दर्जाने उभारून मोठ्या कार्यक्रमांसाठी पूर्वीप्रमाणेच त्याचा उपयोग करता येईल, यासाठी प्राधान्याने चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात, असे ते म्हणाले.
▪️नाट्यगृहात मराठी चित्रपटांचे प्रदर्शन
नाट्यगृहात इतर वेळी मराठी चित्रपट दाखवता यावेत यासाठी पांढरा पडदा आणि प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेव्हा नाट्यगृहाला बुकिंग नसेल, तेव्हा नाममात्र दरात शालेय विद्यार्थ्यांसह चित्रपट प्रेमींसाठी मराठी चित्रपट दाखवण्याची सुरुवात लवकरच करावी, अशा सूचना मंत्री सामंत यांनी केल्या. मराठी भाषा, साहित्य आणि इतिहास सांगणारे सामाजिक चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवल्यास त्यांना शिक्षणासह आपल्या संस्कृतीची ओळख होईल आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आवड निर्माण होईल. याचा भावी पिढीला फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
▪️नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामाची सद्यस्थिती
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग मैदानाच्या नूतनीकरण, जतन, संवर्धन आणि पुनर्बांधणीसाठी 25.10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 7.35 कोटी रुपयांमधून ग्राउटिंगचे काम पूर्ण झाले आहे. कमकुवत भिंती उतरवण्यात आल्या असून गिलाव्याचे कामही पूर्ण झाले आहे. छताच्या ट्रस आणि गर्डर तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर कमकुवत भिंती उतरवून नवीन भिंती बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यातील 3.22 कोटी रुपयांच्या ग्रीन रूम आणि इतर स्थापत्य कामांना सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील 11.77 कोटी रुपयांमधील इंटेरियर, ॲकॉस्टीक, विद्युतीकरण आणि अनुषंगिक कामांच्या निविदा प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू आहे. चौथ्या टप्प्यातील 9.20 कोटी रुपयांच्या स्टेज विद्युतीकरण, ड्रेपरी, ऑडिओ-व्हिडिओ, खुर्च्या आणि अनुषंगिक कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. उर्वरित 2.74 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.