नर्तना स्कूल, शिवाजी विद्यापीठातर्फे उद्यापासून ‘नर्तना उत्सव २०२५’
schedule12 Sep 25 person by visibility 248 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील नर्तना स्कूल ऑफ डान्स आणि शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून (दि. १३) दोनदिवसीय “नर्तना उत्सव २०२५” आयोजित करण्यात आला आहे.
उत्सवाला पुण्याच्या ख्यातनाम भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. विद्यापीठ सुवर्णपदक विजेत्या, सर नागेश्वरराव पुरस्कार आणि राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक असलेल्या डॉ. दैठणकर यांनी भारतात व परदेशात उल्लेखनीय कार्यक्रम, सादरीकरणे केली आहेत. त्या एक कुशल नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका म्हणून भरतनाट्यम परंपरेला समृद्ध करत आहेत.
दोन दिवस चालणार्या या उत्सवानिमित्त शनिवारी (दि. १३) सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत आणि रविवारी (दि. १४) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत डॉ. दैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम कार्यशाळा होणार आहे. सदर कार्यशाळा नर्तन स्कूल ऑफ डान्स, मुक्तसैनिक कॉलनी, कोल्हापूर येथे होणार आहे. या उत्सवाचा समारोप कार्यक्रम रविवारी सायं. ३.३० ते ६.०० वा.पर्यंत शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित असतील. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. समारोप समारंभ सर्वांसाठी मोफत व खुला असून, कला व नृत्यरसिकांनी या महोत्सवासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन नर्तना स्कूल ऑफ डान्सच्या मार्गदर्शक, गुरु कविता नायर आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे. कार्यशाळा व कार्यक्रमाच्या माहितीसाठी स्वराली कडू ९३२५८९७८४२, वैभवी चोपडे ९६२३२५६४२४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.