देवस्थानाच्या मूळ ढाच्याला धक्का लागता कामा नये : सहपालकमंत्री माधुरी मिसाळ
schedule12 Sep 25 person by visibility 228 categoryराज्य

कोल्हापूर : येथील महालक्ष्मी तसेच जोतिबा मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणचे आधुनिकीकरण करत असताना देवस्थानच्या मूळ ढाच्याला धक्का लागणार नाही याची संबंधित एजन्सीने दक्षता घ्यावी, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात देवस्थान (तिर्थक्षेत्र) विकास आराखड्याच्या अनुषंगाने विविध विकास विषयक कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन एस, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली , मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार आदी उपस्थित होते .
त्या पुढे म्हणाल्या, देवस्थानचे सुशोभीकरण होत असताना परंपरागत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही या आराखड्यात विचार करण्यात यावा. कोणावरही अन्याय होऊ नये. तसेच जोतिबा मंदिर ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कुंडातील ( छोटा - तलाव ) पाणी फिल्टर होईल याची दक्षता संबंधित कंत्राटदारांनी घ्यावी असे सांगून महालक्ष्मी मंदिरात भाविकांच्या दर्शन रांगेचा प्लॅनही यामध्ये समाविष्ट करण्यात यावा, अशी सूचना केली. तर जिल्हाधिकारी म्हणाले, या मंदिराच्या ठिकाणी जे अतिक्रमण झाले आहे त्याची मोजणी करण्यात येईल व अनावश्यक अतिक्रमण हटवण्यात येईल. भाविकांची कोणत्याही स्वरूपात गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. यावेळी सह पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक आराखड्यातील निधी खर्चाचे नियोजन ऑक्टोबर अखेर करण्यात यावे, अशी सूचना केली.
या बैठकीनंतर सह पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका व शासकीय संस्था महाप्रीत (MAHAPREIT - महात्मा फुले रिनिव्हेबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड) या दोघांमध्ये ऊर्जा बचत, घनकचरा, शून्य कार्बन, पर्यावरण संबंधित उपक्रम, मूलभूत सुविधा, नव व नवीकरणीय ऊर्जा तसेच आवश्यकतेनुसार इतर प्रकल्पाबाबत ‘सामंजस्य करार’ करण्यात आला.
तत्पूर्वी येत्या 28 सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून सकाळी 7 वाजता 'नशा मुक्ती रन - एक चाल - धाव नशा मुक्त कोल्हापूरसाठी ' या टॅगलाईन खाली नशामुक्त रनचे आयोजन करण्यात आले आहे. त्या आदेशाचे विमोचनही श्रीमती मिसाळ यांनी केले. या देवस्थान विकास आराखड्याच्या आढाव्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षास भेट दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, महाप्रीतचे मुख्य व्यवस्थापक संतोष वाहणे, महाव्यवस्थापक उमाकांत पांडे, मनपाचे कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे, PWD कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, श्री आयरेकर , देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे यांच्यासह संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.