७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराचं बक्षीस प्रदान
schedule18 May 25 person by visibility 267 categoryक्रीडा

कोल्हापूर : कबड्डीत यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सुदृढ आरोग्य लागतं. खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचं ध्येय ठेवावं, नियमित सराव करावा, त्यातून निश्चितच यश मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. ठाणे इथं झालेल्या ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्य स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान खासदार महाडिक यांनी १२ खेळाडूंना प्रत्येकी १० हजार रुपयांचं बक्षीस प्रदान केले.
ठाणे इथं ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्य पद स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर आणि आहिल्यानगर संघाची गाठ पडली. चार वेळा विजेत्या ठरलेल्या अहिल्यानगर संघाला धुळ चारत, कोल्हापूरनं अजिंक्यपद पटकावलं. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचा विशेष सत्कार झाला. प्रा शेखर शहा यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. कोल्हापुरात कबड्डीसाठी दर्जेदार क्रीडांगण असावं, तसच खेळाडूंना चांगल्या सोयी - सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा प्रा. डॉ. रमेश भेंडीगिरी यांनी व्यक्त केली. शंकर पोवार यांनी स्पर्धेचं अहवाल वाचन केलं.
प्रा संभाजी पाटील आणि प्रा रमेश भेंडीगिरी यांनी कबड्डीसाठी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यामुळं कोल्हापुरात अनेक खेळाडू घडल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरातही कबड्डी मैदान साकारलं जाईल. त्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवरून निधी मंजूर करून आणू, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. त्यानंतर तुषार पाटील, दादासो पुजारी, ओंकार पाटील, आदित्य पवार, साईप्रसाद पाटील, सौरभ फगरे, साहिल पाटील, अविनाश चारापले, अवधूत पाटोळे, सौरभ इंगळे, धनंजय भोसले, सर्वेश करवते, संघ प्रशिक्षक शहाजान शेख, व्यवस्थापक प्रा. संदीप लवटे यांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या १२ खेळाडूंना खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं.
यावेळी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कृष्णात पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, विलासराव खानविलकर, अण्णा गावडे, वर्षा देशपांडे, उमा भोसले - भेंडीगिरी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.