शीघ्र प्रतिसादाची तयारी करण्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीम व स्वयंसेवकांना सूचना; पूर व्यवस्थापन प्रशिक्षणास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट
schedule18 May 25 person by visibility 293 categoryराज्य

▪️आपत्कालीन साहित्याची चाचणी व प्रात्यक्षिकाचे आयोजन
कोल्हापूर : पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन चमूच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी तयारी ठेवावी, तसेच आवश्यक साहित्य सुसज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम व उपस्थित स्वयंसेवकांना दिल्या.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संभाव्य पावसाळी पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आज कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात साहित्याची तपासणी व चाचणी करण्यात आली. ‘आपदामित्र’ व ‘आपदासखी’ यांच्यासाठी १८ ते २० मे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेले सर्व साहित्य जसे की इन्फ्लेटेबल रबर मोटर बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, रोप, इमर्जन्सी लाइट इत्यादीच्या साहाय्याने पूर व्यवस्थापनाचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचवणे, दोरीच्या साहाय्याने बचाव करणे, बोटीने शोधमोहीम राबवणे, बोट उलटल्यास बचावकार्य कसे करावे आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, पथकप्रमुख सुनील कांबळे, श्रीकृष्ण सुरते, शुभम काटकर, शुभांगी गराडे, अजित शिंदे, सोमनाथ सुतार तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आपदामित्र व आपदासखी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली आणि उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगा नदीतील प्रात्यक्षिके बोटीद्वारे पाहिली.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्तीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे. प्रशासन आणि आपदामित्र सज्ज असून, आता लोकांमध्येही जलद प्रतिसादाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी बचाव कार्याचे योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे.’
या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणात आपत्ती साधनांचा वापर करून स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशाच प्रकारचे साहित्य चाचणी व प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.