SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्य माहिती आयोगाचा आदेश बसविला धाब्यावर!पनवेल परिसरात भाजपच्या नेत्याच्या कारला अपघातशेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम : केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणाशीघ्र प्रतिसादाची तयारी करण्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीम व स्वयंसेवकांना सूचना; पूर व्यवस्थापन प्रशिक्षणास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेटलश्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्माइस्रायलचा गाझावर हवाई हल्ला, 125 जणांचा मृत्यूहैदराबादमध्ये चारमिनारजवळ अग्नीतांडव, 17 जणांचा मृत्यू७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराचं बक्षीस प्रदान‘महाराष्ट्र दर्शन’ भित्तीपत्रकांचे मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात १९ मे पासून प्रदर्शनसर्वांसाठी घरे योजनाबाबत शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

जाहिरात

 

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम : केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

schedule18 May 25 person by visibility 223 categoryराज्य

▪️२०२६ अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसाचे १२ तास मिळेल स्वच्छ वीज– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा कृषीमंत्र्यांनी केला गौरव

नागपूर :  आमचे शेतकरी हे मेहनती आहेत. निसर्गाच्या प्रत्येक आव्हानाला ते धैर्याने तोंड देतात. आपल्या शेतातील उत्पादनासाठी घाम गाळतात. त्यांच्या घामाला, कष्टाला न्याय देण्यासाठी भारतातील कृषी क्षेत्रासाठी काम करणारे सर्व संशोधक, केंद्र सरकार, राज्य सरकार व सर्व संस्था एकत्र येऊन मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. व्यवस्थेतील ही त्रृटी दूर करण्यासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम म्हणून कृषी विभाग आता काम करेल, अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानअंतर्गत किसान संमेलनात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास कृषी मंत्री ॲड . माणिकराव कोकाटे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड . आशिष जयस्वाल, खासदार श्याम बर्वे, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरु नितीन पाटील, कृषी आयुक्त सुरज मांडरे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे डॉ.एम.एल.जाट, डॉ.एस.के.सिंग, डॉ.अमरेश कुमार नायर, डॉ.डी.के. यादव, डॉ. राजवीर सिंह व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेती व शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी अनुसंशाधन परिषदेअंतर्गत देशात १६ हजार वैज्ञानिक आहेत. त्यांचे विविध पिकांवर सतत संशोधन सुरु असते. याचबरोबर परिषदेअंतर्गत ११३ संशोधन केंद्र आहेत. यातील ११ केंद्र महाराष्ट्रात आहेत. याचा जोडीला जिल्हा कृषी केंद्र, प्रगतशील शेतकरी, राज्य सरकारचे कृषी कार्यालये आहेत. या सर्व यंत्रणेमध्ये एकसुत्रतेचा अभाव लक्षात घेऊन एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम या संकल्पनेची नितांत गरज होती असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

कृषी हा भारतीय व्यवस्थेचा कणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण गौरवशाली भारत, समृद्ध भारत पाठोपाठ शक्तीशाली भारत निर्माण केला आहे. भारत आता वैभवशाली राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. याला अधिक भक्कम जर करायचे असेल तर विकसित शेती व विकसित शेतकरी हे तत्व आपण जपले पाहिजे. विकसित खेती व समृद्ध किसान पाठोपाठ विकसित व गरिबीमुक्त गाव हे शासनाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

▪️मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा कृषीमंत्र्यांनी केला गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात जलसंधारणाची जी कामे केली त्याला तोड नाही. जलयुक्त शिवार महाराष्ट्राला वरदान ठरले. संयम, धैर्य व निश्चयी वृत्तीने त्यांची कार्यशैली कोणत्याही आवाहानात डगमगली नाही या शब्दात केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित असलेले भारतीय कृषी अनुसंशाधन परिषदेचे सर्व संशोधक व वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्राच्या कृषी विकासाचा रोडमॅप तयार करतील असे त्यांनी सांगितले.

देशात कृषी संशोधन करणाऱ्या लॅबची कमतरता नाही. संशोधकाची कमतरता नाही. शासकीय कृषी विभागाचीही कमतरता नाही. कमतरता आहे लॅबला अर्थात संशोधनाला शेताच्या बांधावर पोहोचविण्याची. ही कमतरता भरुन काढण्यासाठी वर्षातील एक महिना कृषी संशोधक, अधिकारी हे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतील असे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले. शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नविन तंत्रज्ञानाला जवळ करण्याशिवाय पर्याय नाही. याच बरोबर विविध खतांसाठी कंपन्यांना शासन जी सबसिडी देते ती सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचा आम्ही निर्णय घेत असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

▪️२०२६ अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसाचे १२ तास मिळेल स्वच्छ वीज– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   

राज्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विजेच्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दिवसाही विजेचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड दिली आहे. यातून १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम आम्ही सुरु केले असून आजच्या घडीला यातील ४ हजार मॅगावॅटची निर्मिती पूर्णत्वास आली असल्याचे ते म्हणाले. २०२६ च्या अखेरपर्यंत आम्ही दिवसाचे १२ तासही वीज देण्यासह राज्यात १२ महिने विजेची उपलब्धता करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीप्रश्न मार्गी लागावा, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सावरता यावे यादृष्टीने देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे त्या नळगंगा-वैनगंगा या प्रकल्पाचे काम यावर्षी सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर तापी मेगा रिचार्ज हा जगातील आश्चर्य असणाऱ्या प्रकल्पाचे काम आपण हाती घेतले आहे. समुद्राला वाहून जाणारे सुमारे 35 टिएमसी पाणी या प्रकल्पातून आपण आणणार आहोत. बुलडाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यातील खारपान पट्टा क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. येथील लाखो शेतकऱ्यांचे जिवनमान या प्रकल्पातून उंचावले जाईल असे ते म्हणाले.

राज्यातील कृषी क्षेत्राला सावरण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना आपण जागतिक बँकेशी चर्चा करुन सुरु केली. सुरुवातीला आपण 5 हजार गावे यासाठी निवडले.  या गावानी साध्य केलेला बदल पाहून जागतिक बँक पुन्हा सहकार्यासाठी तयार झाली. आता त्यांच्या सहयोगातून राज्यातील सुमारे 7 हजार 500 गावात एकात्मिक पद्धतीने काम करुन कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतीसाठी शेतमजूरांचा प्रश्न सर्वत्रच भडसावत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय अधिक भक्कम करुन तो शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवावा लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ग्राम विकास आणि कृषी विकास याचे आदर्श मॉडेल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशमध्ये विकसित करुन दाखविले आहे. शेतीपुढे अनेक आव्हाने आहेत. मातीपासून प्रदूषित पाण्यापर्यंतची आव्हाने असून संशोधक यातून मार्ग देत आहेत. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कटीबद्ध असल्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मृद स्पेक्ट्रल व कापसावरील गुलाबी बोंड अळीला प्राथमिक अवस्थेत नियंत्रणासाठी उपयोगी पडणाऱ्या एआय फेरोमन ट्रॅकचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes