कोल्हापूर महानगरपालिका : थकीत पाणी बिलातील विलंब आकरामध्ये 28 फेब्रुवारी अखेर 80 टक्के सवलत
schedule15 Jan 25 person by visibility 141 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या थकीत पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी एक रक्कमी रक्कम जमा केल्यास विलंब आकारामध्ये दिनांक 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 अखेर विलंब आकारामध्ये 80 टक्के सवलत जाहिर करण्यात आली आहे. यानंतर दिनांक 1 ते 31 मार्च 2025 अखेर चालू मागणीसह थकीत रक्कम एक रक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. सदरची सवलत योजना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली आहे.
शहरात व शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांना कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत पाणी पुरवठा केला जातो. विहीत वेळेत पाणी बिल भरणा केला नाही तर दरसाल दरशेकडा 10 टक्के दराने थकबाकीवर विलंब आकार आकारण्यात येतो. पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येतात. यावर्षी रु.10 हजार पेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सुमारे 13502 थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा पाणी पुरवठा विभागाने लागू केलेल्या आहेत. तसेच 5 वसुली पथकामार्फत धडक मोहीम राबवून थकबाकीदारांकडून वसुलीची कार्यवाही सुरु करुन नळ कनेक्शन खंडीत करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखी कठोर कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी विलंब आकारावर महापालिकेने 30 ते 50 टक्के सवलत योजना जाहीर करण्यात आलेली होती. यावर्षी प्रथमच 80 टक्के इतकी भरघोस सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे.
या सवलत योजनेसाठी पाणीपट्टी व सांडपाणी अधिभार चालू बिलासह थकीत रक्कम एक रक्कमी रोख, धनादेश, डीमांड ड्राफ्टद्वारे, ऑनलाईन, स्पॉट कलेक्शन सिस्टीमद्वारे 100 टक्के भरलेनंतरच पाणीपट्टी व सांडपाणी अधिभार यावरील विलंब आकारामध्ये सवलत देण्यात येणार आहे. या योजनेची अंतिम मुदत दिनांक 31 मार्च 2025 अखेर आहे. यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये व स्पॉट कलेक्शन सिस्टीमद्वारे कार्यालयीन वेळेत व ऑनलाईन सुविधेमार्फत रात्री 11.00 पर्यन्तच राहणार आहे. या सवलत योजनेचा लाभ महानगरपालिकेच्या web.kolhapurcorporation.gov.in या वेबसाईवर लॉगईन करुन ऑनलाईन पध्दतीने पाणी बील भरता येईल. तसेच Googlepay, Phonpe,PayTM मोबाईल ॲपद्वारे सुध्दा पाणी बिलाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
पाणी बिलाची विलंब आकारासह थकीत रक्कम जाणून घेण्यासाठी https://wts.kolhapurcorporation.gov.in/InternalStatement/Index या वेबलिंकचा वापर करावा. या सवलत योजनेचा लाभ शासकीय कार्यालयांना देखील देण्यात येणार आहे. धनादेशाद्वारे पावती केल्यानंतर धनादेश न वटलेस सदरची पावती रद्द करुन थकीत रक्कम पूर्ववत खातेवर वर्ग करण्यात येईल. त्यानंतर ग्राहकास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा ग्राहकांनी पुन्हा विलंब आकारासह संपूर्ण थकबाकी रक्कम रोखीने भरणे आवश्यक आहे. सन 2008-09 पूर्वी थकबाकीने कनेक्शन बंद केलेले ग्राहक असतील तर त्यांची नोंद सध्याच्या संगणक प्रणालीमध्ये नाही. त्यांची नोंद संगणक प्रणालीमध्ये घेऊन योजनेचा लाभ देण्यात येईल. सदर सवलत योजना ही वर नमूद केलेल्या कालावधीत जमा केलेल्या रक्कमांना लागू राहील. या योजनेच्या प्रारंभापूर्वी अथवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना लागू राहणार नाही. योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी (Refund) या योजनेअतर्गत दावा करता येणार नाही. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्या कालावधीचे कोणत्याही प्रलंबीत असलेले अपील, पुनर्निरीक्षणासाठी आलेले आवेदन, न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबीत असल्यास ते विनाअट मागे घेतले पाहिजे. जर सवलत योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनर्निरीक्षण आवेदन, न्यायालयात दावा किंवा रिट याचिका दाखल केली तर आणि भविष्यात पाणीपट्टी कराची रक्कम ज्या-त्या बिलींग कालावधीत जमा न केलेस सवलत योजनेनुसार संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती काढून घेण्यात येतील.
तरी या सवलत योजनेचा सर्व थकबाकीदारांनी लाभ घेऊन थकीत पाणी बिल भरावे व नळ कनेक्शन खंडीत करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे या सारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.