महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ कोल्हापूर शहरानंतर पन्हाळा, वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणार
schedule15 Jan 25 person by visibility 149 categoryराज्य
कोल्हापूर : महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सर्वांचा एक भाग म्हणून महाराणी ताराबाई यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाची बांधणी करण्यात आली असून चित्ररथाचे उद्घाटन कोल्हापूर येथे करण्यात आले.
या विशेष चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे.
किल्ल्याचे स्वरुप असलेला भव्य चित्ररथ, त्यावर महाराणी ताराराणी यांचा भव्य अश्वारुढ पुतळा, राज दरबार तसेच महाराणी ताराराणी यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रण या चित्ररथाच्या माध्यमातून घडते. हा चित्ररथ कोल्हापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील प्रतिसादानंतर 15 जानेवारी रोजी पन्हाळा, दि. 16 रोजी वारणा, दि. 17 ला कागल व दि. 18 ला इचलकरंजी याप्रमाणे चित्ररथ फिरणार आहे.
कोल्हापूर शहरात शाहू महाराज समाधी स्थळ ते दसरा चौक या परिसरात चित्ररथ फिरविण्यात आला. दसरा चौक परिसरात रथ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शाहीर दिलीप सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महाराणी ताराराणी यांच्यावरील विविध पोवाडे सादर केले. यावेळी नागरिकांनी रथाच्या संकल्पनेबद्दल माहिती घेतली. दसरा चौकनंतर तोरस्कर चौक, महाद्वार रोड, गंगावेश येथे चित्ररथ फिरविण्यात आला. गंगावेश येथेही शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याचे सादरीकरण केले.
अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.