SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भालेजागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदशिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या निमित्ताने भाजपा कोल्हापूरच्या वतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमजागतिक कापूस दिन: महत्त्व, इतिहास आणि भारताची भूमिकामतदानाच्या 48 तास आधी प्रचारबंदीकोल्हापूर : अधिकृत फेरीवाल्यांसाठी विशेष कॅम्पला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादकोल्हापूर : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय पात्रता आणि फिटनेस प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका; चौकशीची मागणीतमदलगे येथे आरोग्य शिबिरात ४३० जणांची तपासणी

जाहिरात

 

वंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भाले

schedule07 Oct 26 person by visibility 134 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : वंचित घटकांचा सिनेमा म्हणजे केवळ त्यांच्या दुःखाचे आणि समस्यांचे चित्रण नव्हे, तर त्यांच्या भावनिक जगाचा, अस्तित्वाचा, नातेसंबंधांचा आणि माणूस म्हणून असलेल्या संघर्षाचा संवेदनशील वेध घेणारा सिनेमा असला पाहिजे. सिनेमातील प्रतिनिधित्वाची सुरुवात लेखक आणि दिग्दर्शकाच्या सामाजिक दृष्टिकोनातून होते. त्यामुळे चित्रपटकर्त्यांनी स्वतःच्या पूर्वग्रहांकडे चिकित्सकपणे पाहणे आवश्यक आहे, असे मत वंचित घटकांचे अभ्यासक अविनाश भाले यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभाग आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेतील पहिल्या दिवसाच्या सत्रात ते बोलत होते. ‘एलजीबीटीक्यूचे सिनेमातील चित्रण’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

भाले म्हणाले, आपण ज्या जातीत, सामाजिक स्तरात किंवा वंशात जन्मतो, त्यावरून सिनेमाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात घडत असतो. त्यामुळे पडद्यावर कोणाचे प्रतिनिधित्व कसे केले जाते, कोणाला केंद्रस्थानी ठेवले जाते आणि कोणाला वगळले जाते, यामागे सामाजिक रचना कार्यरत असते. ‘आयडेंटिटी क्रायसिस’, ‘मेल गेझ’ आणि स्टुअर्ट हॉल यांच्या ‘रेप्रेझेन्टेशन कल्चरल थिअरी’च्या माध्यमातून त्यांनी एलजीबीटीक्यू समुदायाच्या सिनेमातील चित्रणाचा वेध घेतला.

सिनेमातील ‘सोशल एक्स्क्लूजन’चा परिणाम केवळ पडद्यावर दिसत नाही, तर चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतही त्याचे प्रतिबिंब उमटते. लेखक, दिग्दर्शक आणि इतर निर्मिती घटकांच्या सामाजिक जाणिवांमधूनच प्रतिनिधित्वाची दिशा ठरते. त्यामुळे वंचित समूहांचे चित्रण करताना त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी त्यांच्या अनुभवांना आणि माणूसपणाला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे, असे भाले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या सत्राच्या सुरुवातीला ज्येष्ठ संपादक व चित्रपट अभ्यासक डॉ. विजय चोरमारे यांनी ‘भारतीय चित्रपटातील वंचितांचे स्थान’ या विषयावर मार्गदर्शन केले. चित्रपटकर्त्यांनी चिकित्सक असायला हवे. केवळ चित्रपट बनविण्याचे तंत्र आत्मसात करण्याबरोबरच चित्रपट समजून घेण्याची दृष्टी विकसित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

बाबूराव पेंटर यांच्या १९२५ सालच्या ‘सावकारी पाश’पासून भारतीय चित्रपटातील सामाजिक आशयाच्या प्रवासाचा मागोवा घेत डॉ. चोरमारे यांनी १९६०च्या दशकातील समांतर चित्रपट चळवळीपर्यंत झालेला विकास स्पष्ट केला. जागतिकीकरणाच्या प्रभावानंतर समांतर सिनेमा आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपट मागे पडल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, मराठी, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांनी सामाजिक आशयाची ही परंपरा टिकवून ठेवली. त्यामुळे वंचितांचे प्रश्न मांडणाऱ्या अनेक चित्रपटांना आज मुख्य प्रवाहातील सिनेमात स्थान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सत्राच्या अखेरीस जागतिक सिनेमाच्या अभ्यासक डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी ‘जागतिक परिदृश्यात वंचितांचा सिनेमा’ या विषयावर मार्गदर्शन केले. जगभरातील विविध चित्रपटांची उदाहरणे देत त्यांनी वंश, जात-धर्म, वसाहतवाद, स्त्रीवाद, मूळनिवासी समुदाय आणि विकलांगत्व यांसारख्या विविध सामाजिक वास्तवांचे सिनेमातील चित्रण विद्यार्थ्यांसमोर उलगडले.

चित्रपटातील कथानक आणि व्यक्तिरेखांच्या पलीकडे त्यामध्ये दडलेले सामाजिक संदर्भ आणि गहिरे अर्थ समजून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ‘उपेक्षितांसाठीचे चित्रपट’ आणि ‘उपेक्षितांचे चित्रपट’ यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. वंचित घटकांचे प्रतिनिधित्व करताना चित्रपटकर्त्यांवर असलेली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी चित्रपटाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन डॉ. करेकट्टी यांनी केले.

कार्यशाळेतील सत्रांचे सूत्रसंचालन सायली गणेश कर यांनी केले. डॉ. विजय चोरमारे यांचे आभार बी.ए. फिल्म मेकिंगचा विद्यार्थी प्रवीण पांढरे यांनी मानले. अविनाश भाले यांचे आभार जान्हवी लायकर हिने मानले, तर डॉ. तृप्ती करेकट्टी यांचे आभार श्रावणी कालेकर यांनी व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes