SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वंचितांचा सिनेमा म्हणजे केवळ दुःखाचे चित्रण नव्हे : अविनाश भालेजागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदशिवाजी मार्केट फेरीवाला सर्वेक्षण: मुदतवाढ व फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करा : नगरसेवक आश्किन आजरेकरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या निमित्ताने भाजपा कोल्हापूरच्या वतीने ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमजागतिक कापूस दिन: महत्त्व, इतिहास आणि भारताची भूमिकामतदानाच्या 48 तास आधी प्रचारबंदीकोल्हापूर : अधिकृत फेरीवाल्यांसाठी विशेष कॅम्पला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादकोल्हापूर : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय पात्रता आणि फिटनेस प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका; चौकशीची मागणीतमदलगे येथे आरोग्य शिबिरात ४३० जणांची तपासणी

जाहिरात

 

जागतिक अभिजात भाषांच्या अनुषंगाने २८ पासून दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

schedule07 Oct 26 person by visibility 155 categoryसामाजिक

◼️कडेगाव येथे होणाऱ्या परिषदेत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा सहभाग

कोल्हापूर : मराठी भाषा, तिची अभिजात परंपरा, भारतीय ज्ञानपरंपरा आणि विविध संस्कृतींमधील भाषिक-साहित्यिक अनुबंध यांचा बहुविषयक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी येथील शिवाजी विद्यापीठ आणि भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अभिजात भाषा आणि साहित्यातील संशोधन: महाकाव्य, काव्य आणि भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. २८ व २९ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या या परिषदेत भारतासह परदेशातील भाषा, साहित्य, अभिजात परंपरा, भारतीय ज्ञानपरंपरा, भाषाविज्ञान आणि संस्कृती या क्षेत्रांतील तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही माहिती परिषदेचे प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे यांनी दिली.

२८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री व संशोधक डॉ. अरुणा ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, आमदार विश्वजीत कदम, विजयमाला कदम, डॉ. के.डी. जाधव, डॉ. एम.एस. सगरे यांची प्रमुख उपस्थिती असेल. 

परिषदेच्या पुढील सत्रांमध्ये भारतीय महाकाव्ये, भाषेचे तत्त्वज्ञान आणि विविध संस्कृतींमधील काव्यपरंपरा या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली जाणार आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागातील प्राध्यापक तथा उर्दू, अरबी, प्राकृत व पर्शियन भाषांचे बहुभाषाविद् अभ्यासक डॉ. बलराम शुक्ला, संस्कृत व बौद्ध साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. माधवी कोल्हटकर तसेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या Infosys Fellow आणि संस्कृत-भारतीयविद्या अभ्यासक डॉ. सुचेता परांजपे, पोलंडच्या विवस्वान फौंडेशनचे सहसंस्थापक व अध्यक्ष आणि वॉर्सा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. फिलिप रुचिन्स्की, गुजरात केंद्रीय विद्यापीठातील स्कूल ऑफ लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चर स्टडीजचे डॉ. प्रशांत धर्माधिकारी आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. हैदराबादच्या सेंटर ऑफ कल्चर अँड क्रिएटिव्हिटी व बृहत एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राघव कृष्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. फुलब्राईट स्कॉलर डॉ. हमीद खान अध्यक्षस्थानी असतील.

 परिषदेत संशोधकांकडून शोधनिबंधांचे सादरीकरण होईल. त्याचप्रमाणे २९ ऑक्टोबर रोजी जागतिक ख्यातीच्या औंध वस्तुसंग्रहालयाला वारसा भेटीचेही आयोजन करण्यात आले आहे. परिषद ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात होणार असून संशोधकांकडून शोधनिबंध मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. मच्छिंद्र कुंभार (९३७२६४१७७१), डॉ. सविता माळी (९७६६४५८४७६) आणि डॉ. महेश माळी (९४२२६७०२८३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes