समाज आणि विद्यापीठात कम्युनिटी रेडिओ दुवा : कुलगुरू प्रा. डॉ. शिर्के; 'शिववाणी' कम्युनिटी रेडिओचे लोकार्पण
schedule15 Aug 24 person by visibility 353 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि समाज यांच्यामध्ये कम्युनिटी रेडिओ दुवा म्हणून काम करेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या शिव वाणी या कम्युनिटी रेडिओचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनी कुलगुरू प्रा. शिर्के यांच्या हस्ते झाले. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीमध्ये सकाळी साडेनऊ वाजता हा समारंभ झाला.
शिवाजी विद्यापीठाचा कम्युनिटी रेडिओ 89.6 मेगाहर्ट्सवर ऐकायला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते नऊ आणि सायंकाळी सहा ते सात असे प्रसारण होणार आहे.
टप्प्याटप्प्याने या प्रसारणाची वेळ वाढवली जाणार आहे.
प्रा. शिर्के म्हणाले, कम्युनिटी रेडिओसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आदी मान्यवरांचे शुभेच्छा प्राप्त झाले आहेत. या मान्यवरांनी विद्यापीठाकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. विद्यापीठ त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
ते म्हणाले, लोकांनी लोकांसाठी चालवलेले माध्यम म्हणून कम्युनिटी रेडिओकडे पाहिले जाते. शिवाजी विद्यापीठाबद्दल लोकांच्या भावना अतिशय चांगल्या आहेत. रेडिओच्या माध्यमातून समाजाशी नव्याने जोडता येणे शक्य आहे आणि यातून समाजाचे प्रेम वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे ज्ञानमेवामृतम हे ब्रीदवाक्य आहे, तर कम्युनिटी रेडिओचे शिवाजी विद्यापीठाची ज्ञान वाहिनी हे ब्रीदवाक्य आहे. याचाच अर्थ शिवाजी विद्यापीठ सातत्याने ज्ञानाची निर्मिती करत आहे आणि आता रेडिओच्या माध्यमातून या ज्ञानाचा प्रसार होणार आहे. संशोधन, लोकविद्या, लोकसंस्कृती, लोककला आदी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी रेडिओचा उपयोग होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखा अधिकारी श्रीमती सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. एस. महाजन, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. ए. ए. जाधव, इनोव्हेशन अँड इंक्युबेशन सेंटरचे संचालक प्रा. डॉ. डी. एस. डेळेकर, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. सुतार, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले, पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, कम्युनिटी रेडिओचे नोडल ऑफिसर डॉ. शिवाजी जाधव, आर जे अभिजित, आर जे कल्याणी, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.