दुधगंगा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधकाचे काम गतीने पूर्ण करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule19 Apr 25 person by visibility 159 categoryराज्य

▪️दुधगंगा काळम्मावाडी धरणाची पालकमंत्र्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
कोल्हापूर : दुधगंगा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधकाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असून ते अधिक गती वाढवून पावसाळा सुरु होण्यापूर्वी जास्तीत जास्त पूर्ण करा,अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
दुधगंगा काळम्मावाडी धरणाच्या पाहणी दौरा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, दुधगंगा कालवा विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता अशोक पवार, दूधगंगा प्रकल्प उप विभागीय अभियंता विजयसिंह राठोड, दूधगंगा प्रकल्पचे सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे, माजी उपसभापती अरुण जाधव, डी. पी पाटील, संजय पाटील, शिवाजी चौगुले, संतोष पाटील, विकास डवर, प्रवीण कदम, सुरेश पाटील, अभिजित धोत्रेकर, सुभाष पाटील, संतोष तायशेटे उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूरासह कर्नाटक राज्याला पाणीपुरवठा करणारा दुधगंगा काळम्मावाडी धरणाच्या सुरु असलेल्या गळती प्रतिबंधक कामांची प्रत्यक्ष आज पाहणी केली. बऱ्याच वर्षांपासून या धरणातून गळतीची दुरुस्ती होण्यासाठी शेतकरी व नागरिकांची मागणी होती. ही गळती प्रतिबंधक करण्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करुन दिला असून गळती प्रतिबंधक उपाययोजनांचे काम सुरु आहे. या गळती प्रतिबंधक दुरुस्तीचे काम पावसाळा सुरु होण्याच्या अगोदर अधिकाधिक गतीने करण्याचा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. दुधगंगा काळम्मावाडी धरण गळती प्रतिबंधकचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात जेवढे पाणी खाली आहे तिथपर्यंत करण्यात येणार आहे. तर उर्वरित काम पुढच्या वर्षी दुसऱ्या टप्प्यात सुरु करण्यात येईल. मागील दोन वर्षांपूर्वी गळतीच्या कारणामुळे शेतीला पाणीपुरवठा कमी होईल अशी शेतकऱ्यांना भिती वाटत होती. याबाबत शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. यासाठी गळतीचे काम अधिक गतीने सुरु असून त्यासाठी जलसंपदा विभाग पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. केंद्र शासनाच्या सी.डब्लू.पी.आर एस. या एजन्सींच्या तज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच पुणे येथील टेमघर धरणाच्या गळतीच्या प्रतिबंधक आधारावर त्याचबरोबर नवनवीन यंत्रणेच्या माध्यमातून दुधगंगा काळम्मावाडी धरणाच्या गळती प्रतिबंधकीचे काम योग्य पद्धतीने सुरु असून येथील कामाचा दर्जा उत्कृष्टपणे सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दुधगंगा काळम्मावाडी धरण पाहणी दौरा करण्यापूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीत अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना दुधगंगा काळम्मावाडी धरणाची ठळक वैशिट्ये, यापूर्वी केलेल्या कामांची माहिती, तज्ञ समितीच्या सूचनांची माहिती तसेच सध्या सुरु असलेल्या गळती प्रतिबंधक कामांची सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी दिली.