जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संविधान संलग्न: डॉ. श्रीकृष्ण महाजन; शिवाजी विद्यापीठात संविधान अमृतमहोत्सव सप्ताहाचे उद्घाटन
schedule26 Nov 24 person by visibility 127 categoryसामाजिक
कोल्हापूर : भारतीयांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी भारतीय संविधान निगडित असून याची जाणीव असणारे प्रगल्भ लोकच प्रगल्भ लोकशाही साकार करतील, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी आज येथे व्यक्त केला.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या संविधान अमृतमहोत्सव सप्ताहाचे उद्घाटन आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. महाजन बोलत होते. मानव्यशास्त्र अधिविभागात हा कार्यक्रम झाला.
डॉ. महाजन यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात भारतीय संविधानाची शक्तीस्थळे आणि सौंदर्यस्थळे यांचे विवेचन केले. ते म्हणाले, भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया प्रत्येक भारतीय नागरिकाने समजावून घेणे आणि त्याविषयी सर्वसामान्यांत जागृती करणे आवश्यक आहे. संविधान ही आपली जगण्याची पद्धती आहे. देश म्हणून आपण काय करणार आहोत, हे संविधानाची प्रास्ताविका सांगते, म्हणून तिला उद्देशिका म्हणतात. संविधान हे काही बाबतीत ताठर तर काही बाबतींत लवचिक आहे. हे संतुलन संविधानाचे सौंदर्य आहे. संविधानात लोककल्याणकारी राज्याची संकल्पना अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहेत. त्याच बरोबरीने संविधानात नागरिकांसाठी काही मूलभूत कर्तव्येही सांगण्यात आली आहेत. आपल्या हक्कांचे संवैधानिक संरक्षण व्हावयाचे असेल, तर कर्तव्यपालनही आवश्यक ठरते. संविधानातील मार्गदर्शक तत्त्वेही भारतीय समाजात सामाजिक-आर्थिक समता आणि न्याय प्रस्थापनेच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, भारतीय नागरिकांनी संविधान समजून घेण्यास प्राधान्य द्यायला हवे. संविधानाचे वाचन ही त्या दृष्टीने पहिली पायरी ठरते. संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. नागरिक हा त्याचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या जीवनामध्ये संविधानाचा स्पर्श कधी-कधी आणि कुठे-कुठे झाला आहे, याचे आत्मचिंतन केल्यास आज आपण घेत असलेला मोकळा श्वास ही सुद्धा संविधानाची देणगी असल्याची जाणीव झाल्याखेरीज राहणार नाही. संविधान अमृतमहोत्सवानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी संविधानाधारित विशेष परीक्षा घेण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या ‘शिव-वाणी’ कम्युनिटी रेडिओवरून संविधानाची माहिती देणारी दैनंदिन मालिका वर्षभर प्रसारित करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते रोपास पाणी वाहून संविधान सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी, तर सूत्रसंचालन अविनाश भाले यांनी केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संयोजन समितीचे सदस्य डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. किशोर खिलारे आदी उपस्थित होते.
▪️उद्या श्रीरंजन आवटे यांचे व्याख्यान
विद्यापीठाच्या संविधान अमृतमहोत्सव सप्ताहामध्ये उद्या, बुधवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता पुणे येथील डॉ. श्रीरंजन आवटे यांचे 'भारतीय संविधान आणि विकसित भारत' या विषयावर व्याख्यान होईल. त्याचवेळी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांच्या 'भारतीय संवैधानिक मूल्ये आणि शिक्षण' या विषयावरील विशेष पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.