आंतरराष्ट्रीय ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६’मध्ये शिवाजी विद्यापीठाचे १६८ संशोधक
schedule13 Jan 26 person by visibility 57 categoryशैक्षणिक
🔹प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचा समावेश; माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अग्रस्थानी
कोल्हापूर : जागतिक पातळीवरील संशोधन कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-२०२६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकूण १६८ संशोधकांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश असून डॉ. पाटील विद्यापीठातील संशोधकांत अग्रस्थानी आहेत.
ए.डी. सायंटिफिक इंडेक्स हा जगभरातील संशोधक व विद्यापीठांचे स्थानांकन करणारा आंतरराष्ट्रीय निर्देशांक असून, संशोधकांच्या एच-निर्देशांक (h-Index), आय-टेन निर्देशांक (i10-Index) आणि शोधनिबंधांवरील उद्धरणे (Citations) या निकषांवर आधारित ही क्रमवारी निश्चित केली जाते. या निर्देशांकांमुळे संशोधनाचा दर्जा, सातत्य आणि जागतिक प्रभाव अधोरेखित होतो.
या निर्देशांकात शिवाजी विद्यापीठातील विविध शास्त्र शाखांतील संशोधकांचा समावेश असून, विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि मानवविद्या या क्षेत्रांतील संशोधन त्यात अंतर्भूत आहे.
विद्यापीठातील आघाडीचे दहा संशोधक (h-Index आधारित) अनुक्रमे असे: डॉ. प्रमोद पाटील (भौतिकशास्त्र), डॉ. एस. पी. गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. केशव राजपुरे (सौरघट), डॉ. अण्णासाहेब मोहोळकर (ऊर्जा अभियांत्रिकी), डॉ. चंद्रकांत भोसले (भौतिकशास्त्र), डॉ. ज्योती जाधव (जैववैद्यकीय अभियांत्रिकी), डॉ. के. एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. संजय कोळेकर (रसायनशास्त्र), डॉ. तुकाराम डी. डोंगळे (विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स), डॉ. अनिल घुले (रसायनशास्त्र).
याखेरीज सदर यादीत पुढे डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. गोविंद कोळेकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. सुशीलकुमार जाधव, डॉ. विजया पुरी, डॉ. जॉन डिसूझा, डॉ. डी.एम. पोरे, डॉ. एस.आर. सावंत, डॉ. गजानन राशीनकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. प्रमोद वासंबेकर यांच्यासह १६८ संशोधकांचा समावेश आहे. या यशामुळे शिवाजी विद्यापीठाची जागतिक संशोधन ओळख अधिक भक्कम झाली असून, विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संशोधन निधी मिळविण्यासाठीही ही बाब उपयुक्त ठरणार आहे.
▪️‘संशोधकांच्या यशाची वाढती कमान अभिमानास्पद’
शिवाजी विद्यापीठाचे संशोधक सातत्याने ए.डी. सायंटिफिक क्रमवारीत झळकत आहेत. शिवाय या यादीमधील त्यांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. विद्यापीठातील संशोधकांच्या यशाची ही वाढती कमान अभिमानास्पद आणि नवसंशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे. हे सातत्य कायम ठेवण्याबरोबरच अधिकाधिक दर्जेदार संशोधन करण्याकडेही हे संशोधक आपली वाटचाल राखतील, असा विश्वास विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी या सर्वांचे अभिनंदन करीत असताना व्यक्त केला. महत्त्वाचे म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे २७६ संशोधक या क्रमवारीत आहेत. त्यामध्ये डॉ. गोसावी यांचा समावेश आहे.

