उपेक्षित व्यक्तींवरील संग्राह्य पुस्तक: भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख
schedule08 Feb 24 person by visibility 494 categoryसंपादकीय
जोतीराव हे आद्य महात्मा होत.ते भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक,स्त्री स्वातंत्र्याचे आणि हक्काचे उद्गाते, शेतकरी व कामगारांच्या दु:खाचे व दारिद्र्याचे निर्मूलन करणारे पहिले पुढारी होत. चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातीभेदाच्या भक्कम भिंती व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद यावर कडाडून हल्ला करणारे पहिले क्रांतीपुरुष होत.तसेच मानवी समानतेची शिकवण देणारे पहिले लोकनेते होत.
भारतीय समाज क्रांतीचे जनक आणि भारतातल्या सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित असा त्यांचा उल्लेख विचारवंतांनी व समाज शास्त्रज्ञांनी केला आहे ,तो सार्थच आहे."बुडती हे जन, न देखवे डोळा || म्हणवूनी कळवळा येई आम्हा ||"या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांना स्त्रि शुद्रादीशुद्र,सर्वसामान्य,गोरगरीब, दीनदलितांच्या तसेच शेतकरी, शेतमजूर,कामगारांच्या दुःख, दारिद्र्य व अन्यायाविरुद्ध अंतःकरणापासून कळवळा असल्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला. खऱ्या अर्थाने ते संत तुकारामांच्या सत्य, स्वातंत्र्य आणि समतेच्या विचाराचे पाईक होते, जातीभेदाच्या भक्कम भिंती व स्पृश्य-अस्पृश्य हा भेद यावर कडाडून हल्ला करणारे पहिले क्रांतीपुरुष होत.त्यांनी आपल्या महान कार्याने इतिहासाच्या पानांवर आपला आगळा वेगळा ठसा उमटवला. अशा या क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले व त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जे सामाजिक व शैक्षणिक कार्य केले, या त्यांच्या महान कार्यात उदात्त अंतःकरणाने, निरपेक्ष भावनेने, सर्वस्व अर्पण करून, समाजाच्या रोषाला व कसल्याही विरोधाला न जुमानता मुस्लिम समाजातील फातिमा शेख व त्यांचे थोरले बंधू उस्मान शेख यांनी फुले दाम्पत्यांना मोलाचे सहकार्य केले. महात्मा फुलें व सावित्रीबाई यांनी शतकानुशतके स्त्री शुद्रादीशुद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या पारंपरिक पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला. त्यामुळे सनातन्यांच्या संतापाला पारावर उरला नाही. या सनातन्यांनी जोतीराव फुले यांच्या वडिलांचे कान भरले व मानसिक दडपण आणले, परिणामी स्वतःचे घर सोडावे लागले. यावेळी फातिमा व तिचे थोरले बंधू उस्मान शेख यांनी फुले दाम्पत्यांना आपल्या घरी रहायला दिले, त्यांचा संसार उभारण्यास मोठा हातभार लावला.सकारात्मक आधार दिला.
फुले दाम्पत्याच्या पुण्यपावन ज्ञानदानाच्या व समाजसुधारणेच्या कार्यात शेख बंधू भगिनी यांनी स्वयंप्रेरणेने, तन मन धनाने झोकून देऊन मोठ्या हिमतीने काम केले. तत्कालीन परिस्थिती पाहता फुले दाम्पत्यांचे कार्य हे अत्यंत कठीण व दूस्तर होते. वाघाच्या गुहेत प्रवेश करावा किंवा अग्नितांडवात उडी घ्यावी यासारख्या फुले दाम्पत्याच्या कार्यात फातिमा व उस्मान शेख यांनी धाडसाने व स्वयंस्फूर्तीने झोकून दिले,
अशा या शेख बंधू भगिनीं यांचे कार्य,त्याग, उदार अंतःकरणाने घेतलेला शैक्षणिक प्रसाराचा वसा, समाजातील गोरगरीब जनतेसाठी असणारी नितांत कळकळ याविषयीची माहिती "भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख" या पुस्तकात लेखक दिनकर विष्णू काकडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. वास्तविक फातिमा शेख या मुस्लिम महिलेने फुले दाम्पत्याच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात मदत केली इतकीच माहिती आजवर जनमानसात आली आहे, तिचा पूर्वेतिहास, तसेच तीने व तीचा भाऊ उस्मान शेख यांनी सामाजिक सुधारणेच्या कार्यात दिलेला सहभाग, याविषयीची माहिती अनेकांना ज्ञात नाही, प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाने ही उणीव दूर केली आहे.फुले अभ्यासकांकडुन सुध्दा फातिमा व उस्मान शेख हे भाऊ बहिण दूर्लक्षीत राहिले होते.
प्रस्तुतचे पुस्तक माहितीपूर्ण व वाचनीय असून ईश्वर अल्लाह एकच आहे,मानवता हा सर्व श्रेष्ठ धर्म, जनसेवा हीच ईश्वर सेवा, ज्ञांनासारखे पवित्र दुसरे नाही, आदी विचार ठसविण्यासाठी व जातीभेद, धर्म भेद, अनिष्ठ रूढी परंपरा यांना विरोध करण्यासाठी संत कबीर यांच्या दोहे व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग वगैरे चा लेखकाने खुबीने वापर केला आहे.१८५७ च्या बंडाचा खरा इतिहास,व १ जानेवारी १८१८रोजी शूर हरिजन सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सेनेचा केलेला पराभव याचा इतिहास महात्मा जोतीराव फुले यांच्या तोंडी घालून चपखलपणे गुंफण केलेली आहे. तत्कालीन मुल्ला मौलवींचा स्त्री शिक्षणाला विरोध असतानाही मुस्लिम मोहल्ल्यात घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या फातिमा शेख यांचे प्रवाहाविरुद्ध निकराने केलेली वाटचाल लेखकाने अधोरेखित केली आहे. समाजशास्त्रीय अभ्यासकांनी व समाजकार्य करणाऱ्यांनी संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
▪️पुस्तकाचे नाव: भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख
लेखक: दिनकर विष्णू काकडे
प्रकाशक: संघमित्रा पब्लिकेशन.
द्वारा, सौ. संघमित्रा दि. काकडे.
टिंबर एरिया,(म्हैसाळवेस), मिरज.ता.मिरज,
जि. सांगली ४१६४१०
प्रथम आवृत्ती: मे २०१९
पृष्ठे:९०, मूल्य:₹.१२५/-
✍️ डॉ.सुनीलकुमार सरनाईक.
कोल्हापूर
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)
🟣🟡🟣