पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन
schedule24 Oct 25 person by visibility 153 categoryराज्य
▪️मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
पुणे, दि. २४: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधेसोबतच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी - नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे. सन २०२६ मध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम करीत आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ट असले तरी पुन्हा नव्याने पात्र मतदारांचे नाव यादीत समाविष्ट करणे आवश्यक आहे, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी कळविले आहे.