‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन
schedule24 Oct 25 person by visibility 140 categoryराज्य
▪️माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
खोल समुद्रातील मासेमारी नौका प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत राबविण्यात आला असून, यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) यांचे कर्ज स्वरूपात आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे.
या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील मच्छीमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (ईईझेड) ट्यूना व इतर सागरी संसाधनांना प्रोत्साहित करणे, तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.
राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेअंतर्गत करण्यात आली होती. यातील जय मल्हार मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी संस्था, मुंबई शहर या संस्थेचा प्रस्ताव एनसीडीसी, दिल्ली यांच्याकडून मंजूर झाला आहे. प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत राबविण्याच्या निर्देशानुसार या नौकांचे बांधकाम उडुपी कोची शिपयार्ड लिमिटेड, मालपे (कर्नाटक) येथे करण्यात आले आहे.
प्रत्येक नौका १८ ते २२ मीटर लांबी, ४०० ते ६०० एचपी इंजिन क्षमता, स्टील हल (Hull) बांधणी, रेफ्रिजरेटेड फिश होल्ड, तसेच जीपीएस, इको साऊंडर, व्हीएचएफ रेडिओ, एआयएस आणि रडार यांसारख्या अत्याधुनिक नेव्हिगेशन व संप्रेषण प्रणालींनी सुसज्ज आहेत. या नौका १० ते १५ दिवसांच्या बहुदिवसीय मासेमारी मोहिमांसाठी योग्य असून, ट्यूना लाँगलाईन व गिलनेट ऑपरेशन्ससाठी सक्षम आहेत. सर्व सुरक्षा मानके डीजी शिपींग यांच्या नियमानुसार आहेत.