जोखीम गटातील व्यक्तींच्या एचआयव्ही तपासण्या प्राधान्याने कराव्यात; जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना
schedule31 Oct 25 person by visibility 149 category
 
        कोल्हापूर : सेक्स वर्कर, स्थलांतरीत कामगार या जोखीम गटातील व्यक्तींसह गरोदर महिला, क्षयरोगी यांच्या प्राधान्याने १०० टक्के एचआयव्ही तपासण्या कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात शाहूजी सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समिती मधून एच. आय. व्ही. तपासणी किट करीता निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे,बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, एआरटी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लिंकड ए.आर.टी.सेंटर समुपदेशक,जिल्हा समुदाय संसाधन समिती सदस्य तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी येडगे यांनी जिल्ह्यातील ४ एआरटी केंद्रात अंतर्गत भौतिक सुविधा वाढवण्यासाठी सूचना केल्या. शुगर, रक्तदाबाची औषधे एआरटीच्या केंद्रात उपलब्ध करुन द्यावे. जनजागृती चे कार्यक्रम राबवावेत. तृतीयपंथीसाठी स्माइल कार्ड वितरणासाठी शिबीरे आयोजित करावीत अशा सूचना देण्यात आल्या.
बैठकीत एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग, क्षयरोग तपासणी, उपचार व पुनर्वसन अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी मागील वर्षाचे आकडेवारीसहित सादरीकरण केले. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत उद्दिष्ठापेक्षा जास्त ६९,४७० एचआयव्ही टेस्ट झाल्या पैकी २६७ जण पॉझिटिव्ह आहेत. याची टक्केवारी ०.४ इतकी आहे. यातील ३४३५६ गरोदर मातांची तपासणी केली पैकी १० महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या. आईपासून बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग वेळेत घेतलेल्या औषधोपचारांमुळे ३८ बालकांपैकी एकाही बाळाला एचआयव्ही संसर्ग झाला नाही.
१२ ऑगस्ट, जागतिक युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन केंद्रांमार्फत सुरु असलेल्या इंटेन्सिफाइड आय. इ. सी. कॅम्पेन अंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतीमध्ये संवेदिकरण चालू असून या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशंसा केली.
 
                     
 
 
 
