प्रगतीसाठी स्वतःची जागरूकता आणि तर्कशुद्ध विचारसरणी अत्यंत महत्त्वाची : सोहम तिवाडे; केआयटी मध्ये सोसायटी वुमेन इंजिनिअर्स च्या वतीने वादविवाद स्पर्धेचे आयोजन
schedule31 Oct 25 person by visibility 190 categoryशैक्षणिक
 
        कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या सोसायटी ऑफ वुमन इंजिनियर्स या व्यासपीठाच्या वतीने नुकतेच आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यत्वे करून महिला अभियंत्यांना सक्षम करणे, त्यांना व्यवसायिक,उद्योजकीय क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणे,प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर सर्व बाजूने त्यांचा विकास व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोसायटी फॉर विमेन इंजिनियर्स कार्यरत आहे.सोसायटी फॉर वुमन इंजिनियर्स या आतंरराष्ट्रीय व्यासपीठाशी पुणे सोडून केआयटी कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अधिकृत महाविद्यालय आहे.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सोहन तिवाडे त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाले “,तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान याचा सुंदर मिलाफ करून अभियंता महिलांनी काळाची पाऊले ओळखत स्वतःला सक्षम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपली अंतर्दृष्टी जागृत होते निर्णय क्षमता सुद्धा वाढते.” आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले, “ अशा स्पर्धांच्या माध्यमातून स्वतःला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मिळते. त्याचबरोबर विचारांची देवाण-घेवाण करताना तात्विक मतभेद होतात.असे मतभेद असताना सुद्धा नम्रतेने दुसऱ्याचे विचार ऐकणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे.
सोसायटी फॉर वुमेन इंजिनियर्स कोल्हापूर विभागाच्या प्रमुख श्रीमती शरण्या मेनन यांनी सर्व क्षेत्रातील महिलांसाठी सक्षमीकरण व समानतेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सोसायटी फॉर वुमेन सोसायटी फॉर वुमेन इंजिनियर्स च्या कार्याचा आढावा त्यांनी मांडला. आपल्या मार्गदर्शनात त्या पुढे म्हणाल्या, “वादविवाद हा प्रगल्भतेतून होणे आवश्यक आहे. त्याच वेळी समोरच्याच्या मताचा आदरही आपण राखला पाहिजे ”.अशा स्पर्धेच्या माध्यमातून विविध लोकांचे विचार ते विचार मांडण्याची पद्धत त्यातील आपल्या चुका, आपले सकारात्मक मुद्दे यांचा तौलनिक अभ्यास स्वतःच्या जडणघडणीला पोषक ठरतो असे विचार त्यांनी त्यांच्या मनोगतातून मांडले.
सोसायटी फॉर वुमन इंजिनियर्सच्या केआयटी च्या समन्वयक प्रा.सुश्मिता सरकार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागतही केले.स्पर्धेच्या परीक्षणासाठी प्रा.श्रुती काशीद व प्रा.क्षितीजा ताशी यांना आमंत्रित  केले होते. एस.डब्लू.ई.व्यासपीठाच्या सह समन्वयक प्रा.जहिदा खान यांनी स्पर्धेच्या परीक्षकांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन तेहजीब सय्यद,व प्रज्ञा शिंदे या विद्यार्थिनींनी केले.
या स्पर्धेमध्ये विविध इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधील ७५ विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग होता. बक्षीस समारंभाचे अध्यक्ष म्हणून अधिष्ठाता विद्यार्थी उपक्रम डॉ जितेंद्र भाट उपस्थित होते.तीन फेऱ्यांमधून झालेल्या या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या साक्षी कुंभार या विद्यार्थिनीने मिळवला. समारोप व बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या भोसले व श्रेया धायगुडे यांनी केले. संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी,अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले अन्य विश्वस्त यांचे मोलाचे प्रोत्साहन व सहकार्य या कार्यक्रमाच्या आयोजनात लाभले. बुद्धिमत्ता, सक्षमीकरण आणि सहकार्याची जाणीव करून देणारी ही स्पर्धा सर्व आयोजक व सहभागी स्पर्धकांना सकारात्मक अनुभव देऊन गेली.
 
                     
 
 
 
