कोल्हापूर महानगरपालिकेचे लसीकरण व आरोग्य सेवेमध्ये चांगले काम : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचा आज प्रारंभ
schedule09 Jun 25 person by visibility 200 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : आरोग्यसेवेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी लसीकरण व आरोग्य विषयक इतर सेवेमध्ये चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महापालिकेच्या पाच नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
छत्रपती ताराराणी चौक, कावळा नाका येथे हा कार्यक्रम पार पडला. या नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचा प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडीक व प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
महापालिकेच्यावतीने शहरात यापुर्वी दहा व आता नवीन पाच आयुष्मान आरोग्य मंदिरे सुरु करण्यात आली आहेत. ही नविन आरोग्य मंदिरे केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून तयार करण्यात आली आहेत. ही आरोग्य मंदिरे कावळा नाका, टाकाळा निगडे हॉल, राजारामपुरी संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, सिध्दार्थनगर व साकोली कॉर्नर या ठिकाणी आजपासून सुरु करण्यात आली आहेत.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी बोलताना शहरातील संपुर्ण आरोग्याची जबाबदारी महापालिकेची असून असंसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणावे. आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण खुप जबाबदारीने काम केले पाहिजे. आरोग्याच्या सेवेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून काम आपन करत आहात. यासाठी सगळयांना मी शुभेच्छा देतो. आमदार राजेश क्षीरसागर व अमोल महाडीक हे शहरातील सर्वच कामामध्ये तत्परतेने लक्ष देत असतात. सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी ते सातत्याने तत्पर असतात. माझी या दोघांना विनंती आहे की उरलेली तेरा नागरी अयुष्यमान आरोग्य मंदिर लवकर पुर्ण व्हावे ही अपेक्षा करतो.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना साधारणत: पंधरा हजार लोकसंख्यला अशा प्रकारचा एक दवाखाना असावा हि राज्य शासनाची संकल्पना आहे. या शुभारंभ प्रसंगी मी महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनपुर्वक अभिनंदन करतो. गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्य ही गंभीर समस्या होऊ पहात आहे. यावर मात करण्यासाठी आपल्याला आरोग्य सेवेमध्ये अनेक बदल करावे लागतील. मुंबईत वर्ल्ड बँक सेंटरमध्ये मित्रा संस्थेच्या झालेल्या बैठकीत सीएसआरआरच्या माध्यमातून आरोग्याच्या सर्व सुविधा मिळण्याकरीता बैठक झाली. यामध्ये पोर्टेबल एमआयआर मशिन, ब्रेनडेड व्यक्तीसाठी योग्य टिटमेंट, प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर निदान करुन तो लवकर कसा बरा करता येईल या मुद्यावर चर्चा झाली. राज्य शासनाच्या विविध नाविण्यपूर्ण योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांना दिला पाहिजे.
या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी महापालिका नागरीकांना उत्तम आरोग्य सेवा देते. महापालिकेच्या मुख्य तीन हॉस्पीटलमधून अजुन चांगल्या सेवा देण्यासाठी डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उप-शहर अभियंता निवास पोवार, अरुण गुजर, सुरेश पाटील, डॉ.अमोल माने, कनिष्ठ अभियंता मिरा नगीमे, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वणकुंद्रे यांनी केले.
▪️आयुष्मान आरोग्य मंदिरामार्फत दिल्या जाणा-या सुविधा
या नविन आरोग्य मंदिरामार्फत प्राथमिक उपचार या शिवाय असंसर्गजन्य आजारावर उपचार, गरोदर माता तपासणी, 0 ते 16 वर्ष वयोगटातील लसीकरण, आवश्यकतेनुसार तज्ञ सेवा, योगासत्रे इत्यादी सेवा मोफत उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या ठिकाणी सकाळी 8 ते 1 या वेळेत बाहय रुग्ण विभाग सुरु राहील व 1 ते 4 या वेळेत बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या मार्फत भागामध्ये सर्व्हेक्षण होणार आहे. तसेच या ठिकाणी योग शिक्षकामार्फत भागातील नागरीकांसाठी मोफत योगशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी स्वतंत्र योग शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.