सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; ७ लाख लाचेची मागणी
schedule09 Jun 25 person by visibility 249 categoryगुन्हे

सांगली : सांगलीत २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी ७ लाखांची लाच मागितल्याबद्दल महापालिका उपायुक्त वैभव विजय साबळे (वय ३१, रा. ग्रीन एकर्स, फ्लॅट नं. ४०३, धामणी रस्ता, सांगली) याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
तक्रारदार यांच्या कंपनीने सांगलीतील २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना घेण्यासाठी महापालिकेत प्रस्ताव दिला होता. हा परवाना मंजूर करण्यासाठी उपायुक्त साबळे याने वरिष्ठांचे नाव सांगून १० लाख रूपये लाचेची मागणी केली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला.
बांधकाम परवाना मंजूर करण्यासाठी दहा लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७ लाख रूपये स्विकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. उपायुक्त साबळे याने ७ लाख रूपये लाचेची मागणी केली. परंतू त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर प्रत्यक्षात ७ लाख रूपये लाच स्विकारली नाही. परंतू त्याने ७ लाखाची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले होते .
दरम्यान वरिष्ठ कार्यालयाने पडताळणी केल्यानंतर उपायुक्त साबळे याच्याविरूद्ध कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सोमवारी सायंकाळी महापालिकेतून साबळे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.