बेळगावच्या राष्ट्रीय साहित्य संमेलनात कोल्हापूरचा डंका! ३ महिला कवयित्रींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
schedule17 May 26 person by visibility 160 categoryसामाजिक
कोल्हापूर : बेळगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या राष्ट्रीय साहित्य आणि कवी संमेलनात कोल्हापूरच्या साहित्य क्षेत्राची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. डॉ. डी. एस. राठोड फाऊंडेशन, सर्किट बेंच फाऊंडेशन आणि शांतिदूत परिवार संचलित या दिमाखदार सोहळ्यात कोल्हापुरातील वंदना साळुंखे, शीला मोहिते आणि सुचिता भोसले या तीन कर्तृत्ववान महिला कवयित्रींना प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. शंकर घनश्यामदास अंदाज यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवलीनप्रभू उगर यांच्या उद्घाटनाने रंगलेल्या या संमेलनात देशभरातील २१ कवी, साहित्यिक आणि ५९ मान्यवरांना गौरविण्यात आले.
यात कोल्हापूरच्या पाचगाव येथील वंदना साळुंखे यांना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा पुरस्कार' व 'उत्कृष्ट कवयित्री पुरस्कार', शीला मोहिते यांना 'छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार' व 'कवी पुरस्कार', तर सुचिता भोसले यांनाही 'कवी पुरस्कार' देऊन त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा गौरव करण्यात आला.
इंडियन पोलीस मित्र भारत आणि न्याय हक्क जनजागरण फेडरेशन यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या सोहळ्यात डीसीपी नारायण भारमणी, बाळासाहेब उदधाट्री, अनिल बनके, वैशाली सुतार आणि अनिता काळे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी कवी सरकार विलास पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी अशोक मोहिते यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, तर अर्चना गुरव, डॉ. मंजू राजेजाधव, सुभाष कुंभार, प्रवीण बेडकिले आणि कमलाकर वटेंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन, अभ्यासपूर्ण व्याख्याने आणि अध्यक्षीय भाषणाने या संमेलनाची सांगता झाली. कोल्हापूरच्या या तिन्ही कवयित्रींच्या सुयशामुळे डॉ. सुरेश राठोड यांच्यासह संपूर्ण साहित्त्यिक वर्तुळातून त्यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.