SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

धक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआड

schedule16 May 26 person by visibility 449 categoryगुन्हे

कोल्हापूर: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणाऱ्या नागरिकांची घरे चोरटे टार्गेट करत असल्याच्या घटना ताज्या असतानाच, कोल्हापुरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरमालक आपल्या कुटुंबासह कोकण दर्शनासाठी गेले असल्याचे पाहून, त्यांच्याच एका विश्वासू मित्राने स्वतःच्याच मित्राचे घर लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल १५ लाख ५६ हजार ४०० रुपये किमतीचे १२० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील रहिवासी असलेले फिर्यादी हे ६ मे २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह कोकण दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करून चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली.
करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस अधिकारी जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, सत्यजित तानगुडे आणि महेंद्र कोरवी यांच्या पथकाला एक महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती मिळाली. पाडळी खुर्द येथील घरफोडीतील सोन्याचे दागिने विकण्यासाठी एक तरुण कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमजवळ येणार असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ हॉकी स्टेडियम परिसरात सापळा रचला.

संशयास्पदरित्या फिरणाऱ्या सिद्धार्थ संजय भालकर (वय २३, रा. बी वॉर्ड, १८६९, मंगळवार पेठ, कोल्हापूर) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १५ लाख ६० हजार ५०० रुपये किमतीचे १२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
जेव्हा पोलिसांनी सिद्धार्थकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली, तेव्हा समोर आलेल्या खुलाश्याने पोलीसही चक्रावून गेले. फिर्यादीचा मित्र केदार पाटील याला पैशांची अत्यंत नड (गरज) होती. केदारला फिर्यादी कुटुंबासह बाहेर जाणार असल्याची पूर्ण कल्पना होती. याच संधीचा फायदा घेऊन केदारने स्वतःच्याच मित्राच्या घरात चोरी केली. हे चोरीचे दागिने बाजारात विकून पैसे आणण्यासाठी त्याने सिद्धार्थ भालकर आणि त्याच्या एका साथीदाराला सोपवले होते. या कामाच्या बदल्यात केदार त्यांना मोठी रक्कम देणार होता.

एलसीबीने आरोपी सिद्धार्थ भालकर याला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी करवीर पोलिसांच्या हवाली केले आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला मित्र केदार पाटील आणि त्याचा दुसरा साथीदार सध्या फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

 ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तसेच अंमलदार वैभव पाटील, सत्यजित तानगुडे, महेंद्र कोरवी, संतोष बंगे, गजानन गुरव, विशाल खराडे, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, अरविंद पाटील आणि अनिल जाधव यांच्या पथकाने केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes