मनसेची शिवतीर्थवर सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक
schedule24 Nov 24 person by visibility 155 categoryराजकीय
मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मनसेला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. मनसेचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यातील 128 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही पराभव झाला होता. तर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही माहीम विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला होता. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत मनसेची बैठक बोलावण्यात आली आहे.
भाजपला सत्तास्थापनेसाठी मनसेसारख्या घटकपक्षांची गरज उरलेली नाही. परंतु, आता राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची जाण ठेवून महायुती मनसेला सत्तेचा लाभ देण्यासाठी काही पावले उचलणार का, हे बघावे लागेल. या पार्श्वभूमीवर शिवतीर्थवरील मनसेची सोमवारची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.