महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना; मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार
schedule23 Nov 24 person by visibility 124 categoryराज्य
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर 'दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना' प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.
आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-क च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज, संबंधित सर्व कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रे हे पडताळणी, अनुवाद चाचणीच्या वेळी सोबत मूळ प्रतींसह सादर करणे अनिवार्य राहील.
लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांने या संदर्भात शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. ६ मधील "लेखनिक/ वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता या परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी" या तरतुदीकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात येत आहे. या परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता, विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीच्या एक टप्पा कमी म्हणजे १२ वी असणे आवश्यक आहे. या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मागणी करणे आवश्यक आहे.
लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रे पडताळणी/अनुवाद चाचणीच्या वेळी प्रपत्र १/प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व नमुना क्रमांक ११ अशी कागदपत्रे सादर करावीत.
शारीरिक दिव्यांगत्व (दोन्ही हात बाधित/नसलेले) / मेंदुचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक ११ सादर करणे आवश्यक नाही.
लेखनिकाची मागणी करणा-या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र १/ प्रपत्र २ मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हतादेखील नमूद करणे आवश्यक आहे.
विहित प्रपत्र १/ प्रपत्र २ व नमुना क्रमांक ११ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.