कोल्हापुरातील महायुतीचे आमदार खास विमानाने मुंबईला रवाना
schedule24 Nov 24 person by visibility 739 categoryराजकीय
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेचे निकाल स्पष्ट होताच महायुतीच्या सर्व विजयी आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय महायुतीच्या तीनही पक्षांच्या विजयी आमदारांची स्वतंत्र बैठक होऊ शकते. दरम्यान यावेळी पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावरही निर्णय होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खास विमानाने कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सात आमदार आज, रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ हे शनिवारी रात्रीच रवाना झाले असून जनसुराज्यचे आमदार विनय कोरे आणि आमदार अशोकराव माने हे दुपारी मुंबईला जाणार आहे. दरम्यान शपथविधीनंतरच हे सर्वजण मतदारसंघात येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल स्पष्ट झाले. यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवण्याच्या हलचालींनी वेग घेतला आहे. मुंबईत महायुतीच्या निवडून आलेल्या आमदारांची बैठक होणार असून त्यादरम्यान विधीमंडळ पक्षाच्या नेत्याचीही निवड होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय घेतला जाऊ शकतो. यादरम्यान महायुतीच्या तीन्ही पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून स्वतंत्र बैठका घेतल्या जाऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा 'तातडीने या' असा निरोप आल्याने मुश्रीफ मुंबईला शनिवारी रात्रीच रवाना झाले. दरम्यान रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी महायुतीच्या आमदारांसाठी खास विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. त्याआधी शनिवारी रात्रीच सर्वांना निरोप देण्यात आले होते. त्यानुसार सर्वजण अकराच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले.
खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राहूल आवाडे हे मुंबईला रवाना झाले.