दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दूध मोजणी कार्यक्रम महत्वपूर्ण : अरुण डोंगळे
schedule19 May 25 person by visibility 176 categoryशैक्षणिक

▪️‘गोकुळ’तर्फे मिल्क रेकॉर्डर यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप
कोल्हापूर : भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला असून या कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी करणाऱ्या संघाच्या स्वयंसेवक (मिल्क रेकॉर्डर) यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते तसेच संघाचे संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे करण्यात आले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डीग प्रोग्रॅम) हा दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण कार्यक्रम असून यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील गोकुळ संलग्न ३२४० म्हैशी/गाय जनावरांची नोंदणी करून हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. म्हैशी व गायीचे अनुवंशीक गुणाचा शोध घेणे व या जनावरापैकी उच्च वंशावळीच्या जनावरांची निवड करणे व या जनावराला अधिक उच्चवंशावळीच्या वळूचा वापर करून पुढील पैदास करणे यासाठी निवडलेल्या जनावरांचे दूध उत्पादन क्षमता, दूधाची गुणवत्ता मोजणे तसेच प्रजननाची नोंदणी ठेवणे व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय, बोरवडे शीतकरण केंद्र व गडहिंग्लज शीतकरण केंद्रावरती ४५ दूध मोजणी व तपासणी सेंटरची स्थापन केली असून प्रत्येक दूध तपासणी सेंटरवर एक आहार संतुलन कार्यक्रमामधील (आर.बी.पी.) स्वयंसेवकांची दूध तपासणीस (मिल्क रेकॉर्डर) म्हणुन नियुक्त केली आहे. त्यांच्यामार्फत निवडलेल्या जनावरांची महिन्यातून एकदा दूध, फॅट व एस.एन.एफ.ची मोजणी व तपासणी ११ महिने केली जाणार आहे. तसेच ६ दूध मोजणी झालेनंतर जनावरांच्या रक्ताचे नमुने घेवून त्यांच्यातील आनुवंशिक गुणाच्या तपासणीसाठी डी. एन. ए. तपासणी केली जाणार आहे. या मिल्क रेकॉर्डनां मिल्क रेकॉर्डींगसाठी स्मार्ट वजन काटे देणेत आले असून या वजन काट्यावरून ब्लुटूथ च्या माध्यमातून थेट दूधाचे वजन भारत पशुधन अॅप्लिकेशन मध्ये जाणार आहे. तसेच दुधाचे नमुने संघाच्या ताराबाई पार्क येथे मिल्क स्कॅनर मशिनद्वारे दुधाची गुणप्रत तपासून त्याची नोंद भारत पशुधन अॅप्लीकेशनमध्ये केली जाणार आहे. हा कार्यक्रम एन.डी.डी.बी.च्या मार्गदर्शना खाली चालू असल्याचे डॉ. दयावर्धन कामत यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंके, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.रणजीत चोपडे व संघाचे अधिकारी, स्वयंसेवक एल.आर.पी.महिला आदि उपस्थित होते.