कोलंबो : श्रीलंका प्रचंड आर्थिक संकटात आहे. त्यामुळे श्रीलंका सरकारला जनतेच्या प्रचंड नाराजीला सामोरे जावे लागत आहे. सरकारने शनिवारी आणीबाणी लागू केली आहे. या विरोधात शेकडो वकिलांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देशाच्या आर्थिक संकटकाळात भाषण स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण सभांचा सन्मान केला जाईल याची खात्री करण्यासाठी आणीबाणी मागे घेण्याची विनंती केली. सरकारच्या माहिती विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रपतींना दिलेल्या अधिकारानुसार शनिवारी संध्याकाळी ६ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या संकटाचा सामना करण्यासाठी भारतातून ४०,००० मेट्रिक टन डिझेलची खेप शनिवारी श्रीलंकेत पोहोचली. श्रीलंकेतील वीज कपात कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या मदतीचा चौथी खेप नवी दिल्लीहून पोहोचली आहे. भारताने श्रीलंकेला इंधन पुरवठा केल्याची माहिती कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांनी दिली. उच्चायुक्तांनी शनिवारी कोलंबोमध्ये ऊर्जा मंत्री गामिनी लोकुगे यांना ५०० मिलियन डॉलर्स लाईन ऑफ क्रेडिटच्या माध्यमाद्वारे भारतीय सहाय्य अंतर्गत ४०,००० मेट्रिक टन डिझेलची खेप सुपूर्द केली.
याआधी पहिल्या मोठ्या अन्न सहाय्यामध्ये कोलंबोने नवी दिल्लीकडून एक क्रेडिट लाइन मिळवली. यानंतर श्रीलंकन नागरिकांसाठी भारतीय व्यापाऱ्यांनी ४०,००० टन तांदूळ पाठवले. श्रीलंकेला परकीय चलनाच्या कमतरतेमुळे अभूतपूर्व आर्थिक आणि ऊर्जा संकटाचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेत इंधन-गॅस, अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे किमती गगनाला भिडल्या आहेत.
श्रीलंकेत वीज प्रकल्प बंद करण्यात आले आहेत, त्यामुळे २.२० कोटी घरांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. दररोज १२-१२ तास वीजपुरवठा खंडित होतो. अनेक महत्त्वाचे कारखाने बंद पडले आहेत. श्रीलंकेत दीर्घकाळ वीज खंडित झाल्यामुळे देशाच्या दळणवळण नेटवर्कवर परिणाम झाला आहे. प्रचंड कर्ज आणि कमी होत चाललेल्या परकीय गंगाजळीमुळे श्रीलंकेला आयातीचे पैसेही देता आले नाहीत. यामुळेच देशात अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
गुरुवारी १३ तासांपेक्षा जास्त काळ वीज कपात लागू करण्यात आली, जी १९९६ नंतरची सर्वात मोठी वीज कपात आहे. त्यावेळी राज्य वीज युनिटच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ७२ तासांचा ब्लॅक आऊट होता. भारतीय डिझेल पुरवठा सध्याचा वीज कपात कमी करेल, असा विश्वास राज्य इंधन शाखा, सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड (CEB) च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.