राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करावे : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
schedule25 Jul 25 person by visibility 240 categoryशैक्षणिक

मुंबई : विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता या बाबी महत्त्वाच्या असल्याने राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण करून शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या अनुषंगाने राज्यातील शाळा इमारत सुरक्षितेसाठी राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी तातडीने बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, समग्रचे प्रकल्प संचालक संजय यादव, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व शिक्षणाधिकारी सहभागी झाले होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिक क्षेत्रातील शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटही करावे. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींची तपासणी करून त्यांची बांधकामे नव्याने करण्यासाठी सर्व्हे करून सर्व समावेशक आराखडा तयार करावा. तसेच धोकादायक शाळा इमारतींच्या बांधकामासाठी प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.