कोरे अभियांत्रिकीचे तसेच एमबीए, एमसीए प्रवेश यावर्षी वारणा विद्यापीठामधून; महाराष्ट्रातील पहिले राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ
schedule25 Jul 25 person by visibility 451 categoryशैक्षणिक

वारणानगर : महाराष्ट्र राज्य शासनाने श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास वारणा विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे. हे महाराष्ट्रातील पहिले राज्य सार्वजनिक समूह विद्यापीठ असून, हे खाजगी किंवा डीम्ड विद्यापीठ नाही तर राज्य शासन चालवत असलेल्या इतर विद्यापीठांच्या बरोबरीचे आहे.
या नवीन विद्यापीठाचे प्रमुख महाविद्यालय म्हणून १९८३ मध्ये स्थापन झालेले तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी काम करेल.
या विद्यापीठाचे कुलपती महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल असतील आणि कुलाधिकारी, कुलगुरू व इतर संचालकांची निवड राज्य शासनाच्या नियमित प्रक्रियेनुसार होईल.
इंजिनिअरिंग आणि फार्मसी या विषयांसाठी प्रवेश महाराष्ट्राच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेनुसार (CAP) होतील. एमएचटी-सीईटी आणि जेईई मेन्स गुणांच्या पर्सेंटाइलवर आधारित हे प्रवेश पार पडतील.
महत्त्वाची सूचना: या शैक्षणिक वर्षात तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना कॅप राऊंडमध्ये वारणा विद्यापीठ हा पर्याय निवडावा लागेल.
केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. सर्व पात्र मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना सुद्धा सुरू राहील. नवीन विद्यापीठ सुरू झाल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था आणि उद्योगांशी सामंजस्य करार झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील.
वारणा विद्यापीठास मान्यता मिळाल्याबद्दल डॉ. विनयरावजी कोरे, अध्यक्ष, वारणा विविध उद्योग व शिक्षण समूह आणि प्रा. डॉ. विलास. व्ही. कारजिन्नी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ यांनी महाराष्ट्र शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. अधिष्ठाता, डॉ. एस.एम.पिसे, प्राचार्य, डॉ. डी. एन. माने यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही सहकार्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क करण्याची आवाहन केले. +९४२१२६१९९२
🟣 वारणा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे या भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी नवीन दिशा मिळेल.
