सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमांना प्रोत्साहन
schedule13 Nov 25 person by visibility 43 categoryराज्य
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी भूमिका-आधारित ऑनलाईन अभ्यासक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) विविध EdTech प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या 51 भूमिका-विशिष्ट अभ्यासक्रमांची निवड केली आहे.
हे सर्व अभ्यासक्रम स्वयं-गती (Self-paced) स्वरूपाचे असून, प्रशासनाच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवरील विद्यमान प्रशिक्षणांना पूरक ठरणार आहेत. प्रत्येक अभ्यासक्रम 27 विषय क्षेत्रांपैकी एका क्षेत्राशी संबंधित आहे आणि अधिकारी आपल्या भूमिकेनुसार, अनुभव व शैक्षणिक पात्रतेनुसार अभ्यासक्रम निवडू शकतात.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मिळालेले प्रमाणपत्र व क्षमतांची माहिती iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवरील अधिकाऱ्यांच्या खात्यात स्वयंचलितरीत्या नोंदविली जाईल. सर्व मंत्रालय विभाग तसेच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हे अभ्यासक्रम पूर्ण करावेत, असे निर्देश उपसचिव विजय एस. यांनी दिले आहेत.