प्रभावी बातमी लेखनासाठी ‘एआय’ टूल्स उपयुक्त : कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्नानी
schedule13 Nov 25 person by visibility 64 categoryराज्य
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा प्रभावी वापर करून बातमी लेखनाची गुणवत्ता अधिक वाढविता येते. यासाठी या टूल्सना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. एआय साधने ही कामाची गती आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आहेत, असे मत एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी मांडले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी एआय ट्रल्सला योग्य सूचना देण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इंग्रजीचे मराठी भाषांतर, शीर्षक लेखन, संभाषण विश्लेषण आणि प्रॉम्प्ट लेखन याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
किशोर जस्नानी यांनी सांगितले की, इंग्रजीचे मराठी भाषांतरासाठी "जेमिनी" हे टूल्स मराठी भाषेसाठी उत्तम असून ते अचूक व सहज भाषांतर देते.
बातमी लेखनात ५डब्लू आणि १एच (व्हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय आणि हाऊ) यांचे भान ठेवून प्रॉम्प्ट तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शीर्षक लेखनाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, एका बातमीसाठी विविध प्रकारची शीर्षके तयार करता येतात. यात छापील आवृत्तीचे शीर्षक, डिजिटल माध्यमासाठीचे शीर्षक, सर्च इंजिनसाठी अनुकूल शीर्षक, त्वरित लक्षवेधी शीर्षक या प्रकारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले."डीपसीक" हे टूल्स शीर्षक तयार करण्यासाठी प्रभावी असल्याचे त्यांनी नमूद केले.
आयडिओग्राम लिओनार्ड जेमिनी या एआय टूल्स मधून उत्तम चित्र निर्मिती करता येते. रेकार्ड संभाषणातून मुद्दे व तपशील टंकलिखित करण्यासाठी ऑटर एआय या साधनांचा वापर करण्यासंदर्भात प्रात्यक्षिक त्यांनी दिले. एखाद्या संभाषणात व्यत्यय असल्यास तो दूर करुन ते संभाषण योग्य पद्धतीने ट्रान्सक्राईब करण्याबाबतही त्यांनी प्राम्प्टसह मार्गदर्शन केले.