डी. वाय. पाटील ग्रुपच्या निखिल कदम यांची ‘महादेवा’ प्रकल्पासाठी ‘सिलेक्टर’पदी नियुक्ती
schedule13 Nov 25 person by visibility 67 categoryक्रीडा
▪️१३ वर्षाखालील प्रतिभावान फुटबॉल खेळाडूंची करणार निवड
कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे फुटबॉल प्रशिक्षक निखिल कदम यांची महाराष्ट्र शासनाच्या ‘महादेवा’ प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या १३ वर्षांखालील मुला- मुलींच्या फुटबॉल राज्यस्तरीय निवड प्रक्रियेसाठी सिलेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हि समिती १३ वर्षांखालील राज्यातील ६० प्रतिभावान खेळाडूंची निवड करणार असून त्याना ‘महादेवा’ प्रकल्प अंतर्गत स्कॉलरशिप प्रदान केली जाणार आहे.
महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक व्यवहार विभाग, मित्रा, VSTF आणि CIDCO यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) च्या सहकार्याने ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यातील पाच जणांची निवड समिती जाहीर करण्यात आली असून त्यात कोल्हापूरच्या निखील कदम यांनी स्थान मिळवले आहे. ही समिती प्रादेशिक निवड चाचणीतून १२० मुला-मुलींची निवड करणार आहे. त्यासाठी 4 ते 23 नोव्हेंबर या कालवधीत छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई येथे येथे प्रादेशिक निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत.
या निवड चाचणीतून निवडलेल्या विद्यार्थ्यांमधून राज्यस्तरीय शिबिरात 60 जणांची अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या प्रतिभावान खेळाडूंना प्रकल्प महादेवा अंतर्गत विशेष फुटबॉल स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते ही स्कॉलरशिप प्रदान केली जाणार आहे.
या निवड समितीत स्थान मिळवून निखिल कदम यांनी डी. वाय. पाटील ग्रुप व कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. ते सध्या डी. वाय. पाटील एज्युकेशन सिटी, तळसंदे येथे फुटबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. निखिल कदम यापूर्वी २३ वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले असून, संतोष ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनसोबत प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
या निवडीबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी अभिनंदन केले.