कोल्हापूर : पाणीपट्टी थकबाकी व अनधिकृत कनेक्शनवर कारवाई; उपद्रव शोध पथकाकडून 1.20 कोटींची वसुली
schedule07 Oct 26 person by visibility 151 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या थकबाकी वसुलीसह अनधिकृत पाणी कनेक्शन व अनधिकृत मोटर जोडणीवर प्रभावी कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दि. 18 ऑगस्ट 2026 ते दि. 6 ऑक्टोबर 2026 अखेर 1 कोटी 20 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपायुक्त परितोष कंकाळ व नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी थकबाकी वसुलीला गती देण्यासाठी चार उपद्रव शोध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून शहरातील थकीत पाणीपट्टीची वसुली करण्याबरोबरच अनधिकृत पाणी कनेक्शन, अनधिकृत मोटर जोडणी आदींची तपासणी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान थकीत पाणीपट्टी असलेली 149 पाणी कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत. तसेच 35 अनधिकृत पाणी कनेक्शन बंद करण्यात आली आहेत. पाणीपट्टी थकबाकी वसुली तसेच अनधिकृत कनेक्शनवरील दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 1 कोटी 20 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
उपद्रव शोध पथकांकडून कसबा बावडा-आंबेडकर नगर, सानेगुरुजी, राजोपाध्येनगर, संभाजीनगर परिसर, गंगाई लॉन, नवीन वाशी नाका, आर.के.नगर, फुलेवाडी, सदर बाजार, फुलेवाडी-बालिंगा रिंगरोड, पाण्याचा खजिना तसेच शिवाजी पेठ आदी परिसरात पाणीपट्टी वसुली व अनधिकृत कनेक्शनविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेची पाणीपट्टी थकबाकी असलेल्या नागरिकांनी आपली थकबाकी तत्काळ भरून महापालिकेस सहकार्य करावे. तसेच अनधिकृत पाणी कनेक्शन अथवा मोटर जोडणी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.