शेतीविषयी संत तुकाराम महाराजांचे प्रबोधन
schedule15 May 24 person by visibility 1451 categoryसामाजिक

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा ही मराठी साहित्य शारदेच्या दरबारातील अमोल रत्न आहे. आपल्या लेखणीतून त्यांनी दिनदुबळ्या समाजाचे प्रबोधन करताना एक ही विषय सोडलेला नाही. विशेष म्हणजे सोळाव्या शतकातील परकीय राजवटीच्या काळात पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञानवादी विचार मांडून त्यांनीं जणूकाही क्रांती केली आहे.
तत्कालीन समाजजीवनात शेती हेच एकमेव उपजिविकेचे साधन होते, शिक्षणाची गंगा समाजजीवनापासून कोसो मैल दूर होती. अज्ञान, अंधश्रद्धा आणि खुळचट प्रथा परंपरेच्या गर्द अंधारात समाज चाचपडत चालत होता. संत तुकोबारायांच्या सूक्ष्म नजरेतून हा सामाजिक विषय सुटला नाही. स्वतः अध्यात्मिक वाटचाल करताना सांसारिक माणसाच्या हाल अपेष्टा त्यांना नजरेआड करता आल्या नाहीत. याकरिता त्यांनी विविध विषयांवर अभंगरचना केलेलीं दिसून येते. शेती आणि शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. तसं पाहायला गेलं तर आजही सांसारिक माणसाच्या जीवनातील शेती हा विषय आपुलकीचा व आदराचा राहिला आहे. तत्कालीन सर्व संसारच शेतीवर अवलंबून होता.भारत हा मुळातच शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शेतीसंबंधी तुकाराम महाराजांनी मार्गदर्शक व उदबोधक असे अभंग लिहिले आहेत.
संत तुकाराम महाराज हे मोरे या मराठा घराण्यात जन्माला आले असलेतरी त्यांच्या वडिलोपार्जित चालत आलेला व्यवसाय हा वाण्याचा होता. तत्कालीन उपजिविकेसाठी ते वाणी म्हणून प्रख्यात असलेतरी पूर्वपरंपरेने असलेली शेती सुध्दा होती. त्याकाळी वाणी हा सावकारकी सुध्दा करायचा. शेती व वाणी ह्या व्यवसायात ते स्वतः पारंगत होते. "तुकाराम महाराज भोळे होते," "त्यांना संसार करण्याची अक्कल नव्हती," वगैरे वगैरे... त्यांच्या विषयीच्या कपोलकल्पित कथा होत्या, हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. शेती व वाण्याच्या व्यवसायात त्यांना स्वतःला आलेल्या अनुभवावरून त्यांनी आपल्या अभंगातून अनेक समाजोपयोगी प्रबोधनात्मक विचार मांडले आहेत.
शेता आले सुगी | सांभाळावे चारी कोण |
पीका आले परी | केले पाहिजे जतन ||
सुगी ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची, उत्साहाची पर्वणी असते. कारण संपूर्ण वर्षभर कष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पीक येते, या सुगीविषयी संत तुकोबाराय म्हणतात, "सुगी आली की,पीक तरारून व भरभरून येते.पण याचवेळी शेतकऱ्यांने या सुगीभरल्या शेताचे डोळ्यात तेल घालून रक्षण केले पाहिजे. यात कसूर केली तर हातातोंडाशी आलेला घास गेलाच म्हणून समजा."
सोंकरी सोकरी विसावा तोवरी| नका खाऊं उभें आहे. तों| गोफणेसी गुंडा झाली पागोट्याच्या नेटे | पळती हा हा कारे अवघी पाखरांचा थाटे||
शेतात पीक आले की, या उभ्या पिकात खाण्यासाठी पाखरे गर्दी करतात आणि यावेळी या पिकलेल्या शेतात पाखरांना हुसकावण्यासाठी शेतकऱ्यांनी गोफण वापरणे आवश्यक आहे या गोफणीला लहान खडा बांधून तो गरगरा फिरवून सोडली की शेतातील पाखरे उडून जातात. शेतात पीक आले की, सुगीच्या काळात गोफण घेऊन हाकारा करणे अत्यंत आवश्यक असते.
पिकवावे धन,| ज्याची आस करी जन ||१|| पुरोनि उरे खातां देतां | नव्हे खंडन मवितां ||धृ.|| खोली पडे ओली बीज | तरीं च हाता लागे निज||२|| तुका म्हणे धणीं | विठ्ठल अक्षरें या तिन्ही||३||.
संत तुकाराम महाराज या ठिकाणी शेतात कष्ट करून मुबलक अन्नधान्य पिकवण्याचा सल्ला देतात, अन्नधान्न्याला सर्व समाजात सर्व काळात मागणी आहे, अन्नधान्याच्या द्वारे समाजाच्या पोटाचा प्रश्न मिटतो, तेंव्हा दक्ष राहून शेती करण्याचा संदेश तुकोबाराय आपल्या अभंगातून देतात.
बीज पेरी सेंती | मग गाडेवरी वाहाती ||१|| वांयां गेले ऐसें दिसे | लाभ त्याचे अंगी वसे ||धृ.||पाल्याची जतन | तरी प्रांती येती कण ||२|| तुका म्हणे आळा | उदक देतां लाभे फळा||३||
शेतकऱ्यांने आपली शेती सतर्क व सावध राहून वेळच्यावेळी केली पाहिजे, बीज पेरणी वेळेवर केली तर गाडया भरून पीक येईल, मात्र यात हयगय केली तर पीक हातातून गेलेच म्हणून समजा. अर्थात शेतीच्या कामासाठी वक्तशीरपणा व शिस्त पाळणे आवश्यक आहे असं तुकोबाराय निक्षून सांगतात.
शिजल्यावरी जाळ | वांयां जायाचे ते मूळ ||१|| ऐसा वारावा तो श्रम | अतिशयी नाहीं काम ||धृ.|| सांभाळावे वर्म | उचिताच्या काळे धर्म ||२|| तुका म्हणे कळे | ऐसे कारणाचे वेळे ||३||
शेतकऱ्यांने सतत तत्पर असणे आवश्यक आहे,असे सांगताना संत तुकोबाराय म्हणतात, आपण शेतीची मशागत करताना ती अत्यंत वेळेवरच केली पाहिजे. वेळ गेल्यावर केलेलें श्रम वाया जाते. त्याचा काहीही उपयोग नाही.ही बाब स्पष्ट करताना तुकोबाराय सांगतात, अन्न शिजेपर्यंत त्याला उर्जा देणे चांगले, पण अन्न शिजल्यावर ही त्याला उर्जा देणे चालूच ठेवले तर ते अन्न जळून करपून जाईल.तात्पर्य वेळेतच सर्व शेतीची कामे करणे फार महत्त्वाचे आहे.
मढे झांकूनियां करिती पेरणी |कुणबियाचे वाणी लवलाहें ||१||तयापरी करीं स्वहित आपुलें |जयासी फावले निर्देश ||धृ.|| ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे|यापरी कैवाडें स्वहिताचें||२|| नाही काळसत्ता आपुलिये हातीं | जाणते हे गुंती उगविती||३|| तुका म्हणे पाहें आपुली सूचना | करितो शाहाणा मृत्युलोकीं||४||
कुणबी म्हणजे शेती कसणारा शेतकरी होय.सुगीच्या काळात येणाऱ्या पिकासाठी आधी पेरणी करावी लागते. ही पेरणी योग्य त्या नक्षत्रावर व्हायला हवी. एकदा का पेरणीची वेळ निघून गेल्यावर होणारी पेरणी उत्पादन देत नाही. यामुळे पेरणीची वेळ कोणत्याही परिस्थितीत गमावून चालणार नाही. कारण ही चुकविणारी वेळ संपूर्ण शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालणारी ठरते. मोठा आर्थिक फटका बसतो. म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात पेरणीला फार महत्त्व आहे. पेरणीची अचूक वेळ पाळणे इतके महत्वाचे आहे की, पेरणीच्या वेळी घरात कुणी मयत झाला तर त्याचे प्रेत झाकून ठेवावे व आधी पेरणी करावी असे स्पष्ट शब्दात संत तुकोबारायांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
संत तुकोबारायांनी आपल्या अभंगातून तत्कालीन समाजजीवनात महत्वाचे असणारे शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीत आवर्जून मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात,
वोणव्या सोनारी | शेत खाल्ले पाखरी || तैसा खाऊ नको दगा | निदसुरा राहुनिया जागा ||
उभ्या पिकात जेव्हा पीक येते, तेव्हा त्याचे रक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाही तर पक्षी पिकांचा सुपडा साफ करतात. हातची पीके गेली की, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, हे नुकसान भरून काढण्यासाठी पुढे दोन सुगी लागतात. अर्थात ही बाब मानवी जीवनात ही लागू पडते. याकरिता प्रत्येक मानवाने परमार्थ करण्यासाठी जागृत राहीले पाहिजे.
इतर कोणत्याही व्यवसायात जितके सावध व जागरूक रहावे लागते, त्यापेक्षा अधिक सावधानता व जागरूकता शेतीसाठी बाळगायला हवी. हा मोलाचा संदेश संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिला आहे.
✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक , कोल्हापूर.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)