कोल्हापूर - शेतीला दिवसा वीज मिळावी या मागणी करीता सुरु असलेल्या आंदोलनातून मार्ग निघण्याची शक्यता आहे. माजी खास. राजू शेट्टी यांची ऊर्जा मंत्र्यांसोबत मंत्रालयात आज बैठक होणार आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून या बैठकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा आजचा चौदावा दिवस आहे. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघनेने विविध प्रकारे आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली होती.
दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ , आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील आंदोलनस्थळी भेट देऊन माजी खास. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या सोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या सोबत बैठकीसाठीचा निरोप रविवारी रात्री साडेअकरा वाजता माजी खासदार शेट्टी यांना मिळाला होता. त्यानुसार रविवारी रात्रीच राजू शेट्टी हे मुंबई साठी रवाना झाले होते. आज दुपारी तीन वाजता मंत्रालयात ऊर्जा मंत्र्यांसोबत ही बैठक होत आहे.