झंडा ऊॅंचा रहे हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज हा अखंड राष्ट्राचा मानबिंदूच. राष्ट्राच्या तेजस्वी अस्मितेचे आणि सांस्कृतिक परंपरेचे ते प्रतिक आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनात आपल्या देशाच्या ध्वजाबद्दल पावित्र्याची भावना असायला हवी, इतकेच नव्हे तर या ध्वजाचा सन्मान कायम रहावा म्हणून प्रसंगी प्राणाचे बलिदान करायला तयार असायला हवे. विविध राष्ट्रांचे ध्वज वेगवेगळे आहेत. वैदीक वाड्:मयात ध्वजाचे महत्त्व सांगितले आहे, तसें धार्मिक क्षेत्रात ही ध्वजाचे स्थान अनन्यसाधारण आहे.
आज कोणत्याही देशाचे नाव घेतले की, त्या त्या देशाचा राष्ट्रध्वज नजरेसमोर येतो. विविध देशांच्या राष्ट्रध्वजांचा अभ्यास करतांना त्या त्या देशांच्या इतिहासाची साक्ष आपल्याला मिळते. त्यातूनच त्या त्या देशांच्या इतिहासातील शौर्य, पराक्रम, राजकीय महत्त्वाकांक्षा, धार्मिक संवेदना,यांचे सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाची परंपरा इ. स. १९०६ पासून सांगता येते. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जे क्रांतिकारक भारतीय तरुण युरोपात जाऊन प्रयत्न करत होते, त्यांना आपल्या देशाच्या स्वतंत्र राष्ट्रध्वजाची नितांत आवश्यकता भासू लागली होती. श्रीमती मादाम कामा यांनी फ्रान्स मध्ये असताना भारतीय स्वातंत्र्याचा एक ध्वज तयार केला. त्यावर केशरी, पिवळा व हिरवा अशा तीन रंगाचे पट्टे होते. पिवळ्या पट्टयावर वंदेमातरम अशी निळ्या रंगातील अक्षरे होती. केशरी पट्टयावर आठ कमळे होती, तर हिरव्या पट्टयावर चंद्र आणि सूर्य चित्रित केलेले होते. जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या समाजवादी परिषदेत हा ध्वज प्रथम फडकविण्यात आला.
इ.स. १९२१ पूर्वी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन युनियन जॅक खालीच होत असे. त्यानंतर हिरवा आणि तांबडा अशा दोनच पट्टयाचा नवीन ध्वज काॅंग्रेस साठी तयार करण्यात आला. पुढे त्यात एक पांढरा आणि चरखा यांची जोड दिली गेली. इ.स. १९३१ साली राष्ट्रीय सभेने आपल्या ध्वजाला निश्चित रुप दिले. पांढऱ्या रंगाच्या पट्टयावर मध्यभागी निळ्या रंगातील चरखा काढण्यात आला. केसरी रंग ध्येर्य आणि त्याग यांचे प्रतीक मानला गेला. शुभ्र (पांढरा) रंग शांती आणि सत्य यांचे द्योतक मानले जाते,तर हिरवा रंग शौर्य आणि श्रध्दा यांचा निदर्शक ठरला.
१५ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, आणि त्या नंतर वरील तिरंगी ध्वजच आपल्या देशाचा राष्ट्रध्वज ठरला गेला. मात्र त्यामध्ये चरख्याच्या जागी अशोक चक्र घेण्यात आले. अशोक चक्र सुध्दा भारतीय संस्कृतीचे एक अर्थगर्भ प्रतिकच आहे. ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हातात हा तिरंगा ध्वज घेऊन अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या स्वातंत्र्याचा होम चेतवून आपल्या प्राणांची आहुती देणारे अनेक भारतीय जवान शहीद झाले.
आपल्या राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या ओठांवर अभिमानाने आपल्या राष्ट्रध्वजाबदद्लचे " विजयी विश्व तिरंगा प्यारा...झेंडा ऊॅंचा रहे हमारा..." हे गीत येते. याञ स्वर्गीय गीत सुरावटी च्या पावित्र्यातच ध्वजदिन, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भव्यदिव्य कार्यक्रम उत्साहात पार पडतो.
आपल्या ध्वजाची परंपरा अत्यंत उज्वल आहे. लाखों लोकांनी त्याच्या सन्मानार्थ बलिदान दिले आहे. या ध्वजाचा सन्मान व पावित्र्य राखणे हे प्रत्येक भारतीय आपले कर्तव्य मानतो.ध्वजाचा सन्मान राखणे हा आपला राष्ट्रीय बाणा आहे.आपल्या देशात विविध धर्म व पंथ आहेत,पण आपण या राष्ट्रध्वजाखाली सर्वजण एक आहोत.आपल्या देशातील विविधतेतून एकता जपणारा व परस्परांची मने जोडणारा हा तिरंगा आपल्या सर्वांना नेहमीच राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय चेतना जागृत करणारा आहे, त्यासाठी तो अखंडपणे फडकत आहे.
✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशीचे संपादक आहेत.)