‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ...
schedule17 Oct 25 person by visibility 71 categoryउद्योग

▪️गोकुळ कडून दीपावलीची दूध उत्पादकांना खास भेट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दि.२१/१०/२०२५ इ. रोजी पासून जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५१.५० वरून रूपये ५२.५० करण्यात येणार आहे. तर गाय दूध खरेदी दरामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३३.०० रूपये वरून ३४.०० रूपये करण्यात येणार आहे. या दर वाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी जवळ-जवळ साडे चार ते पाच कोटीचा जादाचा दर मिळणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही.
गोकुळ दूध संघाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. "गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दि.१२/१०/२०२५ इ.रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच लवकरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.
