जांभळी गावाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिरवाई निर्माण करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule17 Oct 25 person by visibility 51 categoryराज्य

🔹जांभळी गावात वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त चळवळीचा शुभारंभ
कोल्हापूर : ‘आम्ही जांभळीकर’ हे केवळ नावातच नाही, तर कृतीतूनही सिद्ध करत, आम्ही जांभळीकर फाउंडेशनने निसर्गसेवेची पाच वर्षे पूर्ण केल्यानिमित्त जांभळीच्या ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपण तसेच विविध पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्याला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ‘झाडांचे गुण गाऊ, झाडांचे गुण घेऊ’ या संकल्पनेवर बोलताना जांभळीकरांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन निसर्ग संवर्धनाचे इतके मोठे आणि ‘ऑक्सिजन’ देणारे कार्य उभारणे हे केवळ कौतुकास्पद नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दिशादर्शक उदाहरण आहे, असे गौरवोद्गार काढले. आम्ही जांभळीकर फाउंडेशनने पाच वर्षांत केलेल्या अखंड योगदानामुळे हे उद्यान आज गावाचे ‘हिरवे फुफ्फुस’ बनले आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे ट्री मॅन रघुनाथ ढोले, प्रांताधिकारी इचलकरंजी दिपक शिंदे, तहसीलदार शिरोळ अनिलकुमार हेळकर, महेश खिलारी, वन परिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे, विशाल पाटील, अनिल कट्टी, अंजली कट्टी, सरपंच जांभळी अनुजा कोळी यांच्यासह ग्रामपंचायतीचे इतर पदाधिकारी, फाउंडेशनचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जांभळी गावात पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे. गावात १५ एकर क्षेत्रावर १४३ प्रकारची देशी झाडे लावण्यात आली असून, यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च करून ५,००० झाडांची लागवड तसेच विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय, गावात ताम्हणकर पॉईंट, जांभळीचे पॉईंट आणि झेंडावंदन कट्टा अशी सुंदर पर्यावरणपूरक स्थळे विकसित करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त चळवळ आणि आम्ही जांभळीकर कट्टा यांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच राजस्व अभियानांतर्गत तलाठी कार्यालयामार्फत विविध दाखल्यांचेही वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी झाडांचे महत्त्व विशद करताना जिल्ह्यातील प्रत्येक गावात देवराई निर्माण करण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी कापडी पिशव्यांचे वाटप करीत गावातील कापडी पिशव्या वाटप चळवळीचे उद्घाटन केले. संपूर्ण जांभळीकर ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने, ऑक्सिजन पार्क हा केवळ प्रकल्प न राहता एक लोकचळवळ बनल्याचे या कार्यक्रमातून सिद्ध झाले. आम्ही जांभळीकर फाउंडेशन, ग्रामपंचायत जांभळी व समस्त ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.