आरटीओकडून कारवाईपोटी 2 लाखाचा दंड वसूल
schedule17 Oct 25 person by visibility 58 categoryगुन्हे

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (RTO) 9 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रखर दिवे (हाय बीम) लावणाऱ्या 97 वाहनांवर तसेच महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या 48 खासगी प्रवासी बसेसवर कारवाई करण्यात आली असून त्यापोटी एकूण 2 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, निता सूर्यवंशी-पाटील, चंद्रकांत माने आणि सचिन सावदेकर यांच्या नियंत्रणाखाली विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत प्रखर दिवे लावणाऱ्या वाहनांवर 48 हजार 500 आणि खासगी प्रवासी बसेसवर 1 लाख 51 हजार 500 असा एकूण 2 लाखांचा दंड आकारण्यात आला. यापुढेही अशा प्रकारची तपासणी आणि कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती कार्यालयाने दिली.