छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास प्रशासनाची परवानगी
schedule17 Oct 25 person by visibility 53 categoryराज्य

कोल्हापूर : मौजे टाकवडे, ता. शिरोळ येथे सि.स.नं 651 ते 661 पैकी सि.स.नं 654, छत्रपती शिवाजी चौक मध्ये ग्रामपंचायत पटांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रतिष्ठापना करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी खालील अटींच्या अधीन राहून पुतळा उभारण्यास परवानगी दिली आहे.
पुतळा उभारण्यात येणा-या जागेच्या मालकी हक्काबाबत वाद नसावा. पुतळा उभारण्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी टाकवडे ग्रामपंचायतीने घ्यावी. भविष्यात रस्ते रुंदीकरण वा अन्य विकास कामामुळे पुतळा हलविण्याचा प्रसंग आल्यास त्यास विरोध न करता पुतळा हलविण्याचा खर्च तसेच पुतळ्याची देखभाल, मांगल्य व पावित्र्य राखण्याची जबाबदारी, पुतळा उभारण्याचा सर्व खर्च त्याचबरोबर भविष्यातील दुरुस्ती खर्च श्री कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष व ग्रामपंचायतीने करावा.
कोणत्याही परिस्थितीत शासनाकडे निधीची मागणी करु नये. पुतळा उभारण्यात आलेल्या ठिकाणी, सुरक्षेच्या दृष्टीने पुतळ्याच्या संरक्षणाकरिता 24 तास सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी व ग्रामपंचायतीने नेमावेत. तसेच सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.